प्रवृत्ती बदला – ऑनलाइन बुकींगला धावपळ पण लसीकरणाकडे पाठ
पहिल्या दिवशी 82.3 टक्के सहभाग – गरजूंना संधी द्या,लस वाचवा
कोवॅक्सिन लसीचा तुटवडा – ‘ही’ लस मिळणार
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 3 मे सोमवारपासून सुरवात झाली आहे. कोविन या ऑनलाइन अँपवर नोंदणी प्रक्रियाद्वारे लसीकरण केले जात आहे. अनेक जणांनी ऑनलाइन बुकींगला धावपळ करीत स्लॉट बुक केले पण प्रत्यक्ष लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. सोमवारी पहिल्या दिवशी 1 हजार जणांनी नोंदणी केली त्यापैकी 823 जणांनी म्हणजे 82.3 टक्के नागरिकांनी सहभाग घेतला. 177 जण आलेच नाहीत त्यामुळे इतरांची संधी हुकली , ही प्रवृत्ती व मानसिकता बदलणे गरजेचे आहे. लस घ्यायची असेल व त्या दिवशी वेळ राखीव असेल तरच नोंदणी करा अन्यथा इतर गरजूंना संधी देणे गरजेचे आहे. लसीकरणला 100 टक्के प्रतिसाद मिळला तरच लस वाया जाणे पासून वाचविणे शक्य आहे. दरम्यान उस्मानाबाद येथील 45 वयोगटाच्या वरील लोकांना आवश्यक असणारी लस आज संपल्याने लसीकरण मोहीम बंद आहे, लस तुटवडा असताना नोंदणी करून न येणे हे चुकीचे ठरत आहे. सध्या कोविशील्ड ही लस दिली जात असून आगामी काही दिवस तीच दिली जाणार आहे तर कोवॅक्सिन लसीचा तुटवडा आहे.
3 मे ते 7 मे दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याचे स्लॉट बुकिंग फुल्ल झाले असून 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण होत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उमरगा , कळंब व परंडा या 5 ठिकाणी लस दररोज 200 डोस याप्रमाणे ऑनलाइन स्लॉट बुकिंग केलेल्याना लस दिली जात आहे मात्र अनेक नागरिकांत कोवॅक्सिन की कोविशिल्ड यातली कोणती लस घ्यायची याबाबत संभ्रमता आहे त्यामुळे बुकिंग करूनही लसीकरण होत नाही. दोन्ही लस या कोरोनाला प्रभावी असून प्रमाणित आहेत त्यामुळे जी उपलब्ध ती घेणे व सुरक्षित होणे गरजेचे आहे. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात 200 पैकी 170 , कळंब 200 पैकी 175, उमरगा 162, तुळजापूर 159 व परंडा येथे सर्वात कमी 157 जणांनी लस घेतली.
एका व्यक्तीला 0.5 एमएल इतकी मात्रा असलेली लस एक वेळेस इंजेक्शनच्या माध्यमातून दिली जाते व लसीच्या एका व्हाईल किंवा बॉटलमध्ये 10 डोस असतात. ही लस 2 ते 8 डिग्री तापमानात कोल्ड चैन निर्माण करून साठवुन व वापरावी लागते. एकदा लसीची बॉटल खुली केली की तिचा वापर हा 4 तासात करावा लागतो व त्यानंतर याचा वापर करता येत नाही अश्या केंद्र व राज्य सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे काही नागरिक आले नाहीत तर ऑड नंबरमुळे लस वाया जाण्याची शक्यता आहे. कोरोना संकटात लस ही महत्वपूर्ण मानली जात आहे त्यामुळे लस तुटवडा काळात मानसिकता बदलणे गरजेचे आहे. सध्या केवळ सरकारी रुग्णालयात लसीकरण सुरू असून आगामी 15 दिवस तरी लस पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत तर खासगी केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने ही केंद्र बंद आहेत, त्या ठिकाणीही आगामी काही दिवस लस मिळेल असे चित्र नाही.
3 ते 7 मे या काळात या सर्व 5 ही लसीकरण केंद्रावर कोरोनाची सिरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड ही लस दिली जाणार आहे अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी दैनिक समय सारथीची दिली. आगामी काही दिवस कोविशिल्ड लस केंद्रावर दिली जाणार आहे कारण सध्या कोविशिल्डचा पुरवठा केला जात आहे त्यामुळे ज्यांना कोविशिल्ड घ्यायची आहे त्यांनीच ऑनलाईन स्लॉट बुकिंग करावे. 7 मे नंतरचे स्लॉट बुकिंगसाठी खुले केले नसून ते 5 किंवा 6 मे ला खुले केले जातील त्यामुळे नागरिकांनी विचारपूर्वक स्लॉट बुक करावे व तोपर्यंत लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे मिटकरी आवाहन केले.