धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाचे शिव भवानी शिल्प तुळजापूर येथे साकारण्यात येणार आहे. या देखाव्यात तुळजाभवानी देवीची मुर्ती ही अष्टभुजा असल्याचे निश्चित झाले आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राज्याच्या कला संचालनालयाला भेट दिली आहे. यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन ती आमदार पाटील यांच्याशी संबंधित आहे.

शिल्प न्ह्याळताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील
तुळजाभवानी देवींची मुळं मुर्ती अष्टभुजा असली तरी नवरात्र उत्सवात देवींची भवानी तलवार अलंकार पुजा करताना देवी द्विभुजा असते. देवीची वस्त्र अलंकार पूजेत असलेली मुर्ती सर्व भक्तात मान्य असुन तुळजाभवानी मंदीर संस्थान अधिकृतरित्या तिचे फोटो देते. अष्टभुजा मुर्ती करताना ती भारत मातेच्या रूपात दिसते त्यामुळे भाविकांचा त्याला विरोध आहे. मतमतांतरे असताना अष्टभुजा हे रूप निश्चित केले असुन सर्वच्या सर्व 5 मुर्ती अष्टभुजा आहेत. निवड केलेल्या 5 मुर्तीचे फोटो गोपनीय ठेवण्यात आले आहेत, ते भाविकासमोर खुले करावे अशी मागणी होत आहे.

तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात 108 फूट उंच शिवभवानी शिल्पामुळे आणखी मानाचा तुरा खोवला जाणार आहे. हे शिल्प आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अंगाने परिपूर्ण असावे यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांकडून प्रतिकृतींचे आणखी बारकावे तपासले जाणार आहेत. राज्याच्या कला संचालनालयाकडे सादर करण्यात आलेल्या एकूण १४ प्रतिकृतींपैकी पाच प्रतिकृतींची निवड करण्यात आली आहे.धार्मिक आणि प्राचीन इतिहास क्षेत्रातील तज्ञांकडून केल्या जाणाऱ्या सूचनांप्रमाणे पुन्हा नव्याने निवड करण्यात आलेल्या शिल्पकारांना दुरुस्तीसह प्रतिकृती सादर करण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात येणार आहे.
आमदार पाटील यांनी शनिवारी कला संचालनालयाल भेट दिली. प्रचंड ऊर्जेचे स्रोत असलेल्या छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शिल्प प्रतिकृतीचे मनोभावे दर्शन घेतल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे साकारण्यात येणाऱ्या 108 फूट उंच शिवभवानी शिल्पासाठी पाच प्रतिकृतींची निवड राज्याच्या कला संचालनालयामार्फत करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या एकूण 14 प्रतिकृतींपैकी निवडण्यात आलेल्या या पाच शिल्प प्रतिकृतींची पाहणी पुन्हा एकदा तज्ज्ञांच्या समितीकडून केली जाणार आहे. त्यातील अध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक बारकावे तपासल्यानंतरच कुलस्वामिनी तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प अंतिम केले जाणार आहे.
शिल्पकला ,प्राचीन इतिहास संशोधन,धार्मिक आदी क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांच्या या समितीत सहभाग असणार आहे. निवडण्यात आलेल्या प्रतिकृतींची अत्यंत बारकाईने पाहणी केल्यानंतर तज्ञांच्या या समितीकडून आवश्यकतेनुसार काही सूचना आणि फेरबदल सुचविले जातील. आणि त्यानंतर या पाचही शिल्पकारांना सुचविण्यात आलेले फेरबदल आणि सूचना यानुसार पुन्हा एकदा शिवभवानी शिल्पाची प्रतिकृती सादर करण्यासाठी एक महिन्याचा वाढीव वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या पाचपैकी एक प्रतिकृती अंतिम केली जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
अष्टभुजा ‘शिवभवानी’चा अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी विचार सर्व भाविकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. ‘मित्र’चे उपाध्यक्ष तथा तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून या शिल्पाची उभारणी केली जात आहे. तुळजाभवानी मातेचे 108 फुट उंचीचे ब्राँझ धातूचे शिल्प साकारण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत असतानाचे हे शिल्प असणार आहे. हे शिल्प कसे असावे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत अशा 14 शिल्पकारांनी अडीच ते तीन फूट उंचीचे फायबरचे मॉडेल राज्याच्या कला संचालनालयाकडे सादर केले होते. ज्या प्रसंगावर हे शिल्प उभारण्यात येणार आहे, त्याचे धार्मिक, एतिहासिक महत्व मोठे आहे. त्यातील बारकावे अधीक गांभीर्याने समजून घेण्यासाठी एकवेळा मुदतवाढही देण्यात आली होती. त्यानंतर प्राप्त झालेल्या 14 शिल्पांतून 5 शिल्पांची निवड करण्यात आली.
संग्रहालयासह माहिती केंद्रही उभारले जाणार
या नियोजित भव्य शिल्पामुळे भाविकांना केवळ धार्मिक अनुभूतीच नव्हे तर राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे प्रेरणास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेत असलेला अद्वितीय आणि अनुपम देखावा देखील अनुभवता येणार आहे. हे शिल्प श्रद्धा आणि प्रेरणेचे रोमांचक प्रतीक असणार आहे. हे प्रेरणादायी आणि भव्य शिल्प 3 मजली इमारती एवढ्या आकाराच्या बेसमेंटवर उभारले जाणार आहे. या बेसमेंटच्या आत एक संग्रहालय व माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच 20 एकर जागेवर आकर्षक बगीचा साकारण्यात येणार आहे, सोबत आकर्षक प्रकाश योजनाही केली जाणार आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे.