धाराशिव – समय सारथी
येडशी येथील मुकुंद कसबे मृत्यू प्रकरणात वेगवेगळे कारनामे समोर येत असुन यात कसबे यांची बहीण सारिका मोरे यांचे 100 रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द मोरे यांनी हे शपथपत्र उघड केले आहे, धाराशिव ग्रामीण पोलिस निरीक्षक यांच्या नावाने करण्यात आलेल्या शपथपत्रात कसबे यांच्या मृत्यू प्रकरणात कोणाविरुध्द कोणतीही तक्रार नाही. मृत्युस कोणीही जबाबदार अथवा कारणीभुत नाही त्यामुळे कोणाविरुध्दही तक्रार नोंदवायची नाही, असे लिहले आहे. या शपथपत्र प्रकरणाने याला वेगळे वळण मिळाले आहे. शपथपत्र, साक्षीदार यांचे खोटे जबाब घेणाऱ्या मास्टर माईंड व आरोपीला अभय दिले जात असुन याचा तपास थंडावला आहे.

दरम्यान मुकुंद कसबे मृत्यू प्रकरणी आरोपींवर हत्येसह अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अन्यथा 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कसबे यांच्या नातेवाईक यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यातील हा तपास आनंद नगर पोलिसांकडे वर्ग केला आहे. 23 मार्च 2024 ला कसबे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता त्यानंतर 3 ऱ्या दिवशी 26 मार्चला मोरे यांच्याकडुन 100 रुपयांचे शपथपत्र लिहून घेतले, ते तिकीट लावुन ऍड संजय जोगदंड या वकिलांच्या सहीने नोटरी करून घेतले. या शपथपत्रात सर्व घटनाक्रम लिहला असुन ते का व कोणी लिहून घेतले याचा तपास होणे गरजेचे आहे.
येडशी येथील कालिका ढाबा येथे वेटर म्हणुन काम करणाऱ्या कसबे मृत्यू प्रकरणात 2 वेगवेगळ्या कहानी असुन पहिल्यादा अकस्मात मृत्यू तर त्यानंतर 15 महिन्यांनी तो अपघात असल्याचे नमुद करीत 2 गुन्हे नोंद केले आहेत. यात राहुल देशमुख व अपघात झाला असे सांगणारे धनराज कांबळे हे चौकशीच्या रडारवर आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी दिलेल्या अहवालात अनेक गंभीर प्रकार समोर आले असुन तपासातील काही कागदपत्रे जाणीवपूर्वक लपवण्यात आली होती मात्र राठोड यांनी ती शोधून काढली आहेत. कसबे यांनी मारहाण झाल्याचे डॉक्टरांना सांगितले, तसे वैद्यकीय कागदपत्रावर लिहले आहे, तो ऐक प्रकारे मृत्यूपुर्व जबाब आहे.
तत्कालीन पोलिस निरीक्षक मारुती शेळके व काही कर्मचारी हे यातील ‘केंद्र’ स्थानी असुन काही कागदपत्रे वगळून तपास केला. वैद्यकीय उपचाराच्या कागदपत्रामधील 6 पाने समोर येऊ दिली नाहीत. कसबे यांच्या उजवा व डावा हात, खांद्यावर, पिंडरीवर मारहाण झाल्याच्या जखमा होत्या व अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने डोळ्यात रक्त होते असे पोस्टमार्टममध्ये नमुद असताना अंतीम अहवाल पाठवला त्यानंतर 15 महिन्यांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद केला. पोस्ट मार्टममध्ये त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत, त्यामुळे खुनाचा गुन्हा नोंद करावा यासाठी कुटुंबीय आक्रमक झाले असुन आंदोलनाचा इशारा दिला आहे.