10 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी आरोपीस 4 वर्षे सक्त मजुरी व 20 हजार दंडाची शिक्षा
अंध साक्षीदाराची साक्ष ठरली महत्वाची – लाच घेणे पडले महागात
सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे सचिन एस. सुर्यवंशी, अति. शासकीय अभियोक्ता यांनी साक्षीदार तपासले व सदर प्रकरणातील अंतिम युक्तीवाद शासकीय अभियोक्ता शरद बी. जाधवर यांनी केला तसेच सदर प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सर्जे, एएसआय यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात आलेला सबळ पुरावा व शासकीय अभियोक्ता शरद बी. जाधवर यांनी केलेला अंतिम युक्तीवाद ग्राह्य धरुन एम. आर. नेरलेकर, विशेष सत्र न्यायाधीश (एसीबी) उस्मानाबाद यांनी आरोपी लोकसेवक रमेश बाबुराव गवळी यास लाचलुचपत प्रतिबंधक कायदाचे कलम 7 नुसार 03 वर्षे सक्त मजुरी व रु. 10 हजार द्रव्य दंड व कलम 13 नुसार 04 वर्षे सक्त मजुरी व रु. 10 हजार द्रव्य दंड अशी शिक्षा दिनांक 25.03.2022 रोजी सुनावली. दोन्ही कलमातील शिक्षा एकत्रीत भोगायची असल्याने सदर आरोपीस एकूण 04 वर्षे भोगायची आहेे.
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथील न्यायालयाने एका आरोपीस 10 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवीत 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 20 हजार रुपयांचा दंड ठोठवला.अॅट्रोसिटी व विनयभंगाचा दाखल झालेल्या गुन्ह्यात समाज कल्याण कार्यालय येथून मिळणारे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी संबंधीत कार्यालयातील लिपीक रमेश बाबुराव गवळी याने 20 हजारांची लाच मागून तडजोडी अंती 10 हजार स्वीकारले, या प्रकरणात गवळी यांना 4 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. या प्रकरणात जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणात फिर्यादी याचा एक नातेवाईक अंध होता, त्याच्याकडे गवळी याने अनेक वेळा फोन व प्रत्यक्ष भेटून लाच मागितली. गवळी याचा आवाज त्या अंध साक्षीदाराने कोर्टात व लाचलूचपत विभागाच्या कारवाई दरम्यान ओळखला आणि ही साक्ष महत्वाची ठरली.
फिर्यादी आश्विनी शामराव भोसले, पोलीस उपाधिक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी 17 एप्रिल 2015 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहर येथे फिर्याद दिली की, तक्रारदार गोरख शेकाप्पा गवळी रा. येवती ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांच्या पत्नीने पो.स्टे. नळदुर्ग येथे निखील सुभाष गायकवाड व नितीन सुभाष गायकवाड यांचे विरुध्द अॅट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, सदर प्रकरण दाखल झाल्यामुळे समाज कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथून मिळणारे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी संबंधीत कार्यालयातील लिपीक रमेश बाबुराव गवळी यांनी त्यांच्या मोबाईलवरुन फोन करुन गोरख गवळी यांना 20 हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली व तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच स्विकारल्यामुळे गुन्हा दाखल केला. पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहर येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7, 8, 13(1)(डी) सह 13 (2) अन्वये गुन्हा दाखल झाला.
सदर प्रकरणाचे तपास आश्विनी शामराव भोसले, पोलीस उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी करुन तपासाअंती मा. विशेष सत्र न्यायाधीश (एसीबी) यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी मा. विशेष सत्र न्यायाधीश (एसीबी) उस्मानाबाद यांच्या न्यायालयात पुर्ण झाली. सरकार पक्षातर्फे एकुण 7 साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणातील आरोपी रमेश बाबुराव गवळी रा. काकडे प्लॉट,उस्मानाबाद यांनी सन 2015 मध्ये समाज कल्याण कार्यालय उस्मानाबाद येथे कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत असताना पदाचा दुरूपयोग करुन शासकीय कामासाठी तक्रारदार य ास रु,20 हजार लाचेची मागणी करुन 10 हजार शासकीय पंचासमक्ष स्विकारले. सदर आरोपी लोकसेवकांनी त्याच्या पदाचा गैरवापर करुन लाच स्विकारली व लाच लुचपत प्रतिबंधक कायदाचे कलम 7 व 13 नुसार गुन्हा केल्याचे सिध्द झाले.
सदर प्रकरणात तक्रारदार, शासकीय पंच, तत्कालीन समाज कल्याण अधिकारी व प्रत्यक्षदर्शी अंध साक्षीदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.