तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बोगस खतनिर्मितीचा कारखाना बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे, अधिकाऱ्यांनी छापा टाकला तरीदेखील हा सुरूच आहे. तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायझर या नावाने 2 वेगवेगळे बोर्ड लावले असुन समोर तेरणा तर पत्र्याच्या शेडच्या समोरील बाजूस महींद्रा क्राॅप सायन्सेस त्यामुळे नेमक्या कुठल्या नावाने चालतोय असा प्रश्न उपस्थित होतो. प्रशासनाचे याकडे हेतूत दुर्लक्ष केल्याचा आरोप सर्जेराव गायकवाड यांनी केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सर्वे नं 399 मध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बोगस खतनिर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले असुन तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कारखाना एक, नावे मात्र दोन असा हा प्रकार असुन काही तरी गौडबंगाल आहे. या खतनिर्मितीच्या कारखान्यात किंवा बाहेरील बाजूस कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले दिसत नाहीत, त्याठिकाणी कुठलीही सुरक्षा यंत्रणा दिसुन येत नाही, सर्व परप्रांतीय कामगार तिथे विनासुरक्षा काम करत असल्याचे प्रत्यक्षात दिसुन आले.
मागील वर्षी जुलै महीन्यात याच पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकुन खतांच्या 400 गोण्या जप्त करुन तब्बल 6 लाख रुपये किमतीचा माल जप्त केला होता व संबंधित मालकावर तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. सप्टेंबरमध्ये ग्रामपंचायत तामलवाडी येथून संबंधित मालकाने खतनिर्मितीसाठी नाहरकत मिळवले व तसा ठरावही संमत करुन घेतला. ज्या कारखान्यात खतनिर्मिती केली जाते त्याठिकाणी सदरील खताची क्वालिटी चेक करण्यासाठी कुठेही लॅबोरेटरी दिसुन आली नाही.
खतनिर्मितीसाठी किंवा त्याठिकाणी असलेल्या बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात हजारों टन लाकडाचा वापर केला जातोय. एकीकडे धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी 19 लाख वृक्षलागवड करुन जागतीक विक्रम केला तर दुसरीकडे मात्र झाडांची कत्तल करून पर्यावरणाची हानी करून हजारो टन लाकुड या ठिकाणी आणले जातेय.