हिंदू मुलांसोबत का बोलतेस ? धाराशिव येथील 4 जणांवर गुन्हा नोंद – एकास अटक
धाराशिव – समय सारथी
कॉलेजमधील मुलांसोबत का बोलतेस असे सांगत एका महिलेचे अपहरण करुन विनयभंग व मारहाण केल्या प्रकरणी धाराशिव शहरातील 4 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असुन एकास पोलिसांनी अटक केली आहे. मैनोद्दीन पठाण, राजू टपरीवाले, शहबाज तांबोळी, तन्वीर यासह अन्य अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी शहबाज तांबोळी याला अटक केली असुन इतर आरोपीचा शोध घेत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील एका शहरातून मुस्लिम समाजातील एक 22 वर्षीय विवाहित महिला धाराशिव येथे शिक्षणासाठी येते, ती नेहमी प्रमाणे कॉलेजला ऑटोने जाण्यासाठी बसस्थानक परिसरात क्लासमधील 2 मुलांसोबत उभी असताना 10 ते 12 जणांचा घोळका तिथे आला व त्यांनी महिलेवर आणि मुलांवर संशय घेऊन 2 मुलांना व महिलेला ऑटोमध्ये घालून घेऊन शहरातील गाझी मैदान येथे नेले आणि बेदम मारहाण केली त्यानंतर महिलेला बायपास रोड येथे सोडून दिले.
मैनोद्दीन पठाण यांनी महिलेच्या चारित्र्यवर संशय घेऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तु इथे वाईट वागायला येतेस का ? महिलेच्या तोंडावरील कपडे काढत तु हिंदू आहेस की मुस्लिम हे दाखव असे म्हणत मारहाण केली.
घडलेल्या प्रकारावर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आनंद नगर पोलिस ठाण्यात कलम 365, 354 अ, 323, 324, 504, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना 20 मे रोजी घडली होती. तपास पिंक पथकाकडे देण्यात आला आहे.