हक्कभंगाचे अस्त्र – तहसीलदार गणेश माळी यांच्या विरोधात आमदार कैलास पाटील यांची तक्रार
जिल्हाधिकारी यांचा वचक नसल्याने प्रकरण थेट आमदारांचा अवमान करण्यापर्यंत
दप्तर दिरंगाई, नागरिकांना मारहाण व शिवीगाळ वाद घालण्याचे गंभीर आरोप
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथील तहसीलदार गणेश माळी यांच्यावर हक्कभंगासह व नागरिकांना अर्वाचच भाषेत शिवीगाळ आणि मारहाण करणेसह प्रशासकीय कामात दप्तर दिरंगाईची लेखी तक्रार करीत कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमदार कैलास पाटील यांनी महसुल विभागाच्या सचिवांकडे केली आहे. तहसीलदार गणेश माळी यांच्या विरोधात खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदार यांनी अनेक कारणे देत लेखी तक्रार दिल्याने या प्रकरणात काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
उस्मानाबाद तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची गावनिहाय, क्षेत्र व पिकनिहाय माहिती आमदार कैलास पाटील यांनी तहसीलदार गणेश माळी यांच्याकडे मागितली होती परंतु ती माहिती तहसील कार्यालयाने उपलब्ध करून दिली नाही. माळी यांनी जाणीवपूर्वक विधानसभा सदस्याचा अवमान केला आहे त्यांच्या अशा उद्धट वागण्याने शेतकऱ्यांना मदत करण्याच्या कामात अडथळा झाला. विधानसभा सदस्याला अशा प्रकारे दुर्लक्षीत करणे, सन्मानपूर्वक वागणूक न देणे ही बाब हक्कभंग करणारी आहे त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी.
तहसीलदार गणेश माळी यांच्याबाबत शासकीय कामे, तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, जाणीवपूर्वक प्रकरणे प्रलंबित ठेवून दप्तर दिरंगाई करणे, वाद घालणे, नागरिकांना मारहाण करणे अशा तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत त्यामुळे या प्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून माळी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान तहसीलदार माळी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही तर याबाबत आमदार कैलास पाटील यांनी पाठपुरावा करू असे सांगत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी यांचा वचक नसल्याने प्रकरण थेट आमदारांचा अवमान करण्यापर्यंत
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद येथील तहसीलदार विरोधात आमदारांनी गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली असून यानिमित्ताने अनेक प्रश्न समोर आले आहेत. तहसीलदार लोकप्रतिनिधी यांना अशी वागणूक देत असतील तर सामान्य नागरीक व जनतेचे काय हाल असतील याचा अंदाज येऊ शकतो. मुख्यालयी असलेल्या तहसीलदारांवर कर्तव्यदक्ष अशी जनमानसात ओळख असलेल्या जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी यांचे प्रशासकीय नियंत्रण व समन्वय आहे की नाही ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याचमुळे की काय आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार न करता थेट सचिवांकडे तक्रार केली.
दरम्यान माळी यांच्याबाबत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर यापूर्वी व्हायरल होत चांगलेच गाजले होते मात्र त्यावर कोणतीच ठोस कारवाई जिल्हाधिकारी यांनी न केल्याने हे प्रकरण थेट आमदार यांचा अवमान करण्यापर्यंत गेले आहे. हक्कभंगाच्या निमित्ताने हे प्रकरण व खदखद समोर आली आहे. इतर अनेक विभागात लोकप्रतिनिधी यांना हिनतेची वागणुक दिली जात आहे. काही अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांचे ठरवून फोन न उचलणे, प्रशासकीय बैठकांना बोलावून सुद्धा न जाणे व माहिती न देणे असे प्रकार वाढत आहेत. राजकीय नेतृत्वाची प्रशासनावर पूर्वी असलेली पकड व वचक कमी झाल्याचे हे प्रतीक आहे. जिल्ह्याचा विकास व नागरिकांची कामे होण्याच्या दृष्टीने हा चुकीचा पायंडा मराठवाड्यात फक्त उस्मानाबाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.