स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उस्मानाबाद नगर पालिका देशात ८७ व्या स्थानावर
कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कार्याची पावती – नगराध्यक्ष राजेनिंबाळकर
उस्मानाबाद – समय सारथी
देशामध्ये राबवल्या जात असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान मोहिमेमध्ये उस्मानाबाद शहराने अव्वल स्थान पटकावले आहे. यामध्ये उस्मानाबाद शहर ८७ व्या क्रमांकावर आहे.गेल्या वर्षी असलेल्या १७२ क्रमांकावरून उस्मानाबाद नगर परिषदेने ८७ व्या क्रमांकावर गरुडझेप घेतली आहे.
केंद्र सरकारच्या संकल्पनेतून स्वच्छ सर्वेक्षण मोहीम देशभरात राबवली जात आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात उस्मानाबाद शहरांमध्ये स्वच्छता विभागाच्या वतीने राबवलेल्या विविध उपक्रमांचे मूल्यांकन गृहीत धरून देशातील पहिल्या १०० मध्ये उस्मानाबाद शहर नगरपालिकेने ८७ वे स्थान पटकावले आहे. मागच्या वर्षी २०२० उस्मानाबाद शहराचा १६२ वा क्रमांकावर होता.
देशांमध्ये छत्तीसगड हे राज्य प्रथम क्रमांकावर असून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे १ लाख ते १० लाख लोकसंख्या असलेल्या ३७२ न.पा. मध्ये उस्मानाबाद शहराने पहिल्या १०० मध्ये आपले स्थान पटकावले आहे. २०११ लोकसंख्येनुसार (१ लाख १२ हजार ८२५) स्वच्छ सर्वेक्षण अभियान मूल्यांकन निवड समितीने शहराचे मूल्यांकन केलेले आहे.
उस्मानाबाद नगरपालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजनिंबाळकर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे,स्वच्छता विभागाचे सुनील कांबळे, स्वच्छ शहर अभियान मोहिमेचे समन्वयक बाळकृष्ण पडवळ यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचे हे फलित असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील यवतमाळ, अकोला,अचलपूर जिल्हा अमरावती आणि मीरा भाईंदर या नगरपालिकांच्या तोडीस तोड उस्मानाबाद नगरपालिकेने स्वच्छतेमध्ये अव्वल काम केलेले आहे अशी माहिती मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांनी दिली आहे. उस्मानाबाद नगर पालिकेच्या कर्मचार्यांनी शहर स्वच्छतेसाठी केलेल्या सामाजिक कार्याची ही पावती आहे असे मत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले.