सोमवारपासून कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार
दररोज 200 डोस – ऑनलाइन नोंदणीने बुकिंग असेल तरच लस
केवळ 5 केंद्रावर 18 ते 45 वर्षातील नागरिकांना मिळणार लस
उस्मानाबाद – समय सारथी
कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवार 3 मे पासून सुरू होत आहे त्यानुसार राज्य शासनाची कोविडची लस उस्मानाबाद जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. यामधून जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पाच ठिकाणी हे लसीकरण सुरू केले जाणार आहे. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी करून स्लॉट बुक केले आहेत त्यांनाच केवळ ही लस दिली जाणार आहे. सुरुवातीला केवळ 5 ठिकाणीच 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे तर अन्य केंद्रावर 45 वर्षापुढील व इतर पात्र लाभार्थीना लस मिळणार आहे त्यामुळे ग्रामीण भागात केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, उपजिल्हा रुग्णालय कळंब आणि उपजिल्हा रुग्णालय परांडा या 5 ठिकाणी लसीकरण सुरुवातीच्या टप्प्यात सुरू होणार आहे. या ठिकाणी सोमवारपासून दररोज प्रत्येकी दोनशे लाभार्थ्यांना लसीकरण करता येणार आहे. याकरिता लाभार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे आणि ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली आहे आणि त्या दिवसाचा स्लॉट बुक केलेला आहे त्यांनाच त्याठिकाणी लसीकरण केले जाईल. त्यामुळे ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली नाही आणि संबंधित ठिकाणाचा त्या दिवसाचा स्लॉट बुक केलेला नाही, अशांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये.
जिल्ह्यातील अन्य लसीकरण केंद्रे असून त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर आहेत. तेथील लसीकरण सत्रांमधून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि 45 वर्षावरील वयाचे नागरिक यांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Harshadkawade