सेवा समाप्ती – करोडोंच्या शोषखड्डे घोटाळ्यात तांत्रिक सहायक सगर यांच्यावर कारवाई
कंत्राटी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई तर ग्रामसेवक यांच्यावर टांगती तलवार
सहायक गटविकास अधिकारी सुरेश तायडेच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रलंबित – अन्य योजनात घोटाळा
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समितीचे तांत्रिक सहायक राकेश पांडुरंग सगर व स्वाती रोहिदास कांबळे यांचा घोटाळ्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश रोहयो उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिले आहेत. सगर यांच्यावर उपळा गावात 20 लाख रुपयांचा अपहार केल्याचा तर कांबळे यांनी उपळा, मेडसिंगा व बेंबळी या गावात 65 लाखांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या घोटाळ्याचे जनक असलेले मास्टर माईंड तत्कालीन गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून तो विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे. कंत्राटी कर्मचारी यांना तात्काळ कठोर शिक्षा तर शासकीय अधिकारी, ग्रामसेवक यांचे लाड केले जात असल्याचा आरोप होत आहे. तायडे यांच्यासह ग्रामसेवक यांना सेवेतून बडतर्फ करण्यासह विभागीय चौकशीची मागणी होत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत उस्मानाबाद तालुक्यातील खेड, बेंबळी,मेडसिंगा, ढोकी व उपळा या 5 गावात सार्वजनिक शोषखड्ड्यात अपहार केल्याचे समोर आले आहे. यात चौकशी अहवाल आला आहे. ग्रामसेवक ए व्ही आगळे व एस बी सुर्वे यांना दोषी ठरवत कारणे दाखवा नोटीस बजावली असून ग्रामरोजगार सेवक रितापुरे, शित्रे व माने यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.
तांत्रिक सहायक राकेश पांडुरंग सगर व स्वाती रोहिदास कांबळे यांनी शोषखड्डे झालेले नसताना चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केले, प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता अहवाल दिले त्यामुळे त्यांची सेवा खंडित करुन कार्यमुक्त केले आहे. सगर यांचा पदभार उस्मानाबाद तहसील कार्यालयातील तांत्रिक सहायक प्रवीण गडदे यांना देण्यात आला आहे. सगर व कांबळे यांच्या ताब्यातील सर्व संचिका, अभिलेख व मोजमाप पुस्तिका ताब्यात घेण्यास सांगितले आहे.
या घोटाळ्यात सगर व कांबळे यांची सुनावणी होणार असून त्यात त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे काम केले यासह अन्य मुद्याची चौकशी होणार आहे. सत्य मांडण्याची ही त्यांना शेवटची संधी असणार आहे.