सेमी इंग्रजी – जिल्हा परिषदेचे उद्या विशेष सभा, आम्ही सकारात्मक – अध्यक्ष अस्मिता कांबळे
गोलमाल – बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी गैरहजर मात्र अहवालावर सही
निर्णय घेतला की लादला ? डायट अहवाल सुद्धा सही विनाच
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील सरसकट सेमी इंग्रजी बंद बाबत उद्या 27 जानेवारी रोजी गुरुवारी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी दिली. कोरोना नियमामुळे ही सभा ऑनलाईन होणार असून यात जिल्हा परिषद शाळेत सरसकट म्हणजे सर्व शाळेत सेमी इंग्रजी सुरु ठेवण्याबाबत निर्णय होणार आहे. सेमी इंग्रजी सुरु ठेवण्याबाबत आम्ही सकारात्मक असून या विषयात कोणतेही राजकारण येणार नाही , राजकीय मतभेद असले तरी लोकांच्या विकासासाठी हिताचा निर्णय घेणार आहोत. सेमी इंग्रजी सुरु ठेवण्याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व 1083 शाळेत 2012-13 या शैक्षणिक वर्षांपासून सेमी इंग्रजी सुरु आहे मात्र जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सरसकट सर्व शाळेत सुरु असलेले सेमी इंग्रजी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे समिश्र प्रतिक्रिया असून ग्रामीण भागात पालकात नाराजीचा सुरु आहे.
जिल्हा परिषदेचा सेमी इंग्रजी हा निर्णय स्तुत्य, प्रामाणिक होता, स्पर्धेच्या युगात गोरगरीब विद्यार्थी यांना चांगले शिक्षण मिळावे हा हेतू आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेचा पट वाढला असून चांगला शैक्षणिक दर्जा मिळाला आहे. सर्व शाळात सेमी इंग्रजी बाबत आम्ही सकारात्मक असून शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही डायटची होती, त्यासाठी सेस फंडमधून निधी ठेवला आहे मात्र त्यांनी प्रशिक्षण दिले नाही ही दुर्दैवाची बाब आहे. मराठी या मातृभाषेचा अभिमान आहे मात्र इंग्रजी सर्वांना येणे गरजेचे आहे. हा निर्णय घेताना जिल्हाधिकारी व प्रशासनानाने आम्हाला विचारले नाही किंवा मतही जाणून घेतले नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
विशेष सभा यासाठी आयोजित केली असून यात सर्व सदस्य यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. सरसकट सेमी इंग्रजीसाठी नेमक्या काय परवानग्या , प्रशिक्षण , सुविधा, त्रुटी याची पूर्तता केली जाईल पाठपुरावा करू, कोणत्याही स्तिथित सर्व शाळेत सुरु असलेले सरसकट सेमी इंग्रजी बंद केले जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.
गोलमाल – बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी गैरहजर मात्र अहवालावर सही
13 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखली जिल्हा परिषद शाळातील सेमी इंग्रजीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, डायट प्राचार्य बळीराम चौरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी हजर होते. या बैठकीचे इतिवृत करीत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 13 जानेवारी रोजी सरसकट सेमी इंग्रजी बंद बाबत निर्णय घेतला. 13 जानेवारीचा हा 10 पानाचा निर्णय असून यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, सीईओ व इतर अधिकारी यांच्या सह्या आहेत. मुळात 13 जानेवारी रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अरविंद मोहिरे हे उस्मानाबाद येथे नव्हते. मोहिरे हे बैठकीला प्रत्यक्ष हजर नव्हते त्याचे वतीने प्रतिनिधी हजर असल्याचे इतिवृत्तात नमूद आहे मात्र 13 जानेवारीच्या निर्णय आदेशावर मोहिरे यांची सही आहे. त्यामुळे खरंच या विषयावर चर्चा होऊन सर्वांची मते विचारात घेतली की निर्णय घेऊन तो अधिकारी यांच्यावर सही करण्यासाठी लादला गेला याची जोरदार चर्चा होत आहे. महिरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी टाळाटाळ केली.
निर्णय घेतला की लादला ? डायट अहवाल सुद्धा सही विनाच
निर्णय सर्वानुमते घेतला की इतर अधिकारी यांच्यावर तो लादला याची चर्चा होत असतानाच डायटचा अहवाल सुद्धा संशयाच्या फेऱ्यात आहे. डायटने 2018 साली केलेला अहवाल हा पिपीटी ( पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन) आहे त्यावर कोणाचीही सही नाही, हाच अहवाल ग्राह्य धरत सेमी इंग्रजी बंदचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात अहवालाचा 2018 च्या अहवालाचा दाखला घेतला आहे तो अहवाल गुगल लिंक द्वारे सर्वेक्षण करून बनविला आहे. त्यात 4500 पैकी 2501 इतक्या शिक्षकांनी सहभाग नोंदवीला असे नमूद आहे त्यानुसार 90 टक्के शिक्षकांनी मातृभाषेतून शिक्षण असावे तर 10 टक्के शिक्षकांनी शिक्षण इंग्रजीत असावे असे म्हण्टले आहे.25 टक्के शिक्षकांचे आशय ज्ञान चांगले दिसून आले. 26 टक्के शिक्षक इंग्रजीतून स्पष्टीकरण देऊ शकतात. 28 टक्के शिक्षक हे इंग्रजीतून अध्यापन करतात.
2019 मध्ये डायटने सेमी इंग्रजी माध्यमातून अध्यापन केल्याने निदर्शनास आलेली फल निष्पत्ती अहवाल 30 एप्रिल 2020 लेखी सादर केला आहे. त्यात फक्त 20 टक्के विद्यार्थी यांना गणित व विज्ञान विषयाचे प्रश्न योग्य पद्धतीने लिहता आले. 25 टक्के विद्यार्थी यांना प्रश्न बरोबर वाचता आले, 18 टक्के विद्यार्थी यांना प्रश्न समजले. 12 टक्केना सोडविता आले. 15 टक्के विद्यार्थी यांचा अध्यापनानंतर प्रतिसाद चांगला दिसून आला.