सुपर स्प्रेडर सुसाट तर गृहविलगीकरण केलेले अनेकजण मोकाट
कोरोना संसर्ग कसा कमी होणार ? प्रशासनाने काही बदल करणे आवश्यक
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागात कोरोना सुपर स्प्रेडर सुसाट आहेत तर गृहविलगीकरण केलेले अनेकजण मोकाट असल्याने कोरोना संसर्ग कसा व कधी कमी होणार ? हा प्रश्न समोर आला आहे. प्रशासनाने काही बदल करणे आवश्यक आहे तर कोरोना नियंत्रण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांनी स्वयंशिस्त व नियमांचे स्वतः पालन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत या पॉझिटिव्ह रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक मित्र परिवार खुलेआम व सर्रास दवाखान्यात ये जा करीत असल्याने हा गट मोठा सुपर स्प्रेडर ठरत आहे. प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात या लोकांवर काही वेळा अचानक कारवाई करीत त्यांची कोरोना तपासणी केली त्यात काही जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले मात्र त्यातूनही लोकांनी धडा घेतलेला दिसत नाही शिवाय हा प्रकार आजही सर्रास सुरू आहे. शासकीय रुग्णालयात कारवाई होते मात्र खासगी रुग्णालयात तर रान मोकळे आहे तिथे ना नियम ना विचारणारा कोणी ? ये जा करण्याचा हा प्रकार बंद झाला तर रोजचा आकडा व संसर्ग काही प्रमाणात कमी होईल.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर ज्यांना कोरोनाची काहीच किंवा सौम्य लक्षणे आहेत त्यांना डॉक्टर यांच्या सल्याने गृहविलगीकरण म्हणजे होम आयसोलेशन केले जाते या काळात या लोकांनी घरातील इतर सदस्य यांच्यापासून लांब व सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे शिवाय घराबाहेर न येणे गरजेचे आहे मात्र मला काहीच लक्षणे नाहीत त्रास नाही मग काय होणार ? या आवेशात काही मंडळी खुलेआम फिरत असल्याने कोरोना संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसून कुटुंबातील अनेकजण पॉझिटिव्ह येत आहेत. उस्मानाबाद शेजारील काही जिल्ह्यात सक्तीने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सीसीसी म्हणजे कोरोना केअर सेंटरमध्ये पाठविले जाते त्यामुळे संसर्गला आळा आला आहे मात्र उस्मानाबाद येथे सोयीनुसार गृहविलगीकरण करण्यात येत असल्याने आकडेवारी कमी होत नाही विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक तालुक्यासह मोठ्या गावात सीसीसी केंद्र चांगले आहेत त्यामुळे गृहविलगीकरण सुविधा पाहून मर्यादीत किंवा बंद केले पाहिजे.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद करण्याचे आदेश असताना काहीजण छुप्या मार्गाने दुकाने उघडत आहेत त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली तरी काही जणांची सवय मोडलेली नाही. पोलीस महसूल आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी व वेळी कारवाई लक्ष ठेवणे प्रत्यक्षात शक्य नाही त्यामुळे लोकांनी सामाजिक जबाबदारी व भान ओळखून वागणे गरजेचे आहे तर अश्या चुकार लोकांबाबत नागरिकांनी सजग होत त्याची माहिती प्रशासना पर्यंत देणे गरजेचे आहे तरच उस्मानाबाद जिल्ह्यातील संसर्ग लवकर आटोक्यात येईल अन्यथा 700 ते 900 हा रोजचा आकडा कायम राहील.
गृहविलगीकरण केल्याने प्रशासकीय यंत्रणेवरचा व्यवस्था व देखरेख ठेवण्याचा ताण कमी होत असला तरी संसर्ग मात्र लवकर नियंत्रणात येत नाही. पॉझिटिव्ह रुग्ण सीसीसी केंद्रवर काही दिवस क्वारनटाईन ठेवल्यास त्याचे चांगले परिणाम यापूर्वी पहिल्या लाटेत दिसून आले आहेत. गृहविलगीकरण बंद केल्यास वैद्यकीय , पोलीस व महसूल यंत्रणावरचा ताण वाढतो मात्र संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात येतो.
महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण घटले ही बातमी या संकटात थोडी दिलासा देणारी असली तरी संकट अजून टळले नाही, काही जिल्ह्यात आकडेवारी तात्पुरती कमी जास्त झाली असली तरी नियमांचे पालन करणे व काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातुर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, ठाणे,वाशिम या 12 जिल्ह्यातील रुग्णसंख्या गेल्या 15 दिवसात घटली असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.