सुटका – तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे अखेर 21 दिवसानंतर जेलमधुन बाहेर
धाराशिव – समय सारथी
विविध गुन्ह्यातील आरोपी असलेले धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना अखेर 21 दिवसानंतर दिलासा मिळाला आहे. फसवणूक, भंगारचोरी व अट्रॉसिटी या गुन्ह्यात पोलिस कोठडी त्यानंतर जेल व जामीन ही प्रक्रिया पार पाडून यलगट्टे हे कारवाईच्या जाळ्यातून म्हणजे जेलमधून बाहेर आले आहेत. पोलिसांनी त्यांना 4 एप्रिल रोजी अटक केली होती. यालगट्टे हे जेलमधुन बाहेर येताच त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असुन तपासासाठी शनिवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावली आहे.
दैनिक समय सारथी वृत्तपत्राने यलगट्टे यांच्या नगर परिषद आवारातील भंगार चोरी, बँक खाती व चेक बाउन्स प्रकरण, बोगस कागदपत्रे आधारे बांधकाम परवाना या कारनाम्याचा भांडाफोड करीत पाठपुरावा केला होता.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत व एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यलगट्टे यांना 4 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात जाऊन नाशिक ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील लासलगाव येथे ही कामगिरी केली आहे.यलगट्टे हे त्यावेळी बसमधून प्रवास करीत होते त्यांना बसमधूनच अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर, शहर पोलीस ठाण्याचे उस्मान शेख यांच्या पथकांचा यात समावेश होते. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अनेक तांत्रिक मुद्याचं विश्लेषण करीत फरार आरोपीचा ठिकाणा शोधन्यासाठी मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, चव्हाण, तुपे, अशोक ढगारे, बलदेव ठाकूर, रवी अरसेवाड यांनी त्यांनी सापळा रचत ही अटक केली.
हक्कभंग प्रकरण प्रलंबित –
यलगट्टे हे बांधकाम परवान्यात शासनाची फसवणूक, भंगारचोरी व जातीवाचक शिवीगाळ या 3 गुन्ह्यात फरार आरोपी होते त्यात अटक होऊन कायदेशीर कारवाई झाली आहे. विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी हक्कभंग दाखल केला आहे त्याच्या कारवाईची प्रक्रिया सुरु असुन टांगती तलवार कायम आहे तर इतर काही प्रकरणात यलगट्टे याच्यावर कारवाई प्रस्तावित आहे. धाराशिव नगर परिषदेच्या योजनाचे विशेष तपासणी मोहीम सुरु असुन त्यात काय बाहेर येते याकडे लक्ष लागले आहे.
2 चौकशी समितीचा अहवाल प्रलंबित –
7 जुलै 2020 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीतील नमुना, नगर परिषद यांना लागू असलेल्या सर्व योजनाच्या बँक खात्याची यादी व बँक विवरणपत्र, सर्व योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व कामांच्या संचिका व प्रमाणके, बँक ताळमेळ विवरणपत्र, सर्वसाधारण बँक पुस्तक नुमना व बँक खातेनिहाय नोंदवही द्यावी यासाठी चौकशी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोंदर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरु आहे तर धाराशिव नगर परिषदेत खुल्या जागेवरील प्लॉट व इतर प्लॉटच्या बोगस गुंठेवारी केल्याची लेखी तक्रार आमदार सुरेश धस यांनी केली असुन या बोगस गुंठेवारी प्रकरणाची 15 दिवसात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.