सीबीआयचे पथकाची उस्मानाबाद जिल्ह्यात धाड – आयपीएस अधिकारी बदली प्रकरणातील दलाल धागेदोरे
उस्मानाबाद – समय सारथी
सीबीआयच्या गोपनीय पथकाने 27 जुलै रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेळका धानोरा या गावात तपासणी करीत पुरावे गोळा केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदलीच्या कामात महादेव इंगळे हा दलाल होता त्याच्या घरी तपासणी करून आईचा जबाब घेतल्याची माहिती आहे.आयपीएस अधिकारी बदली प्रकरणातील दलाल धागेदोरे थेट उस्मानाबाद पर्यंत पोहचल्याने खळबळ उघडली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी तथा राज्य गुप्तवार्ता विभागाच्या कमिशनर रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना एक लेखी गोपनीय अहवाल 25 ऑगस्ट 2020 रोजी पाठवला होता त्यात त्यांनी काही दलालांची टोळी मोठी रक्कम घेऊन मंत्री व राजकीय नेत्या यांच्या मार्फत पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करीत असल्याचे म्हटले होते. यासाठी त्यांनी दलालांचे फोन टॅप करीत त्याचे तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण केले होते.त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शेळका धानोरा हे मूळ गाव असलेल्या महादेव इंगळे या व्यक्तीचा समावेश होता.
रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या लेखी अहवालानुसार महादेव इंगळे याचा फोन 29 जुलै 2020 पासुन सर्वेक्षणाखाली होता. इंगळे हा आपल्या राजकीय व इतर प्रतिष्ठित व्यक्तींचे संपर्क वापरून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदल्या मोठी रक्कम घेऊन करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. इंगळे याने बुलढाणा पोलीस अधीक्षक संदीप भुजबळ, निसार तांबोळी, नांदेड पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, श्रीधर जी, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड,गुन्हे अन्वेषण पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, दिबंगर प्रधान,सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उस्मानाबादचे अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, सोलापूरच्या वैशाली कडुकर, आर्थिक गुन्हे शाखेचे पराग मनेरे,मिलिंद मोहिते, धुळेचे राजू भुजबळ, पनवेलचे अशोक दुबे, राहुल धस, राहुल खाडे, भरत तंगडे, राहुल श्रीरामे यां 18 अधिकाऱ्यांच्या बदलीचे काम हाती घेतले होते.
महादेव इंगळे याचे राजकारणी व इतर लोकांशी संबंध असुन तो पोलीस अधिकारी व्यतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, महाडा विभागाचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी अशा विविध विभागातील अधिकारी यांचे बदलीचे काम हाती घेतले होते. या बदल्या करताना तो सांगत असे की गृहमंत्री अनिल देशमुख व दादा यांच्या मार्फत हे काम मी करून देईल. इंगळे याचे लाचलुचपत विभागाचे औरंगाबाद येथील पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे यांच्या जवळचे संबंध होते इंगळे हे त्यांच्या सुद्धा बदलीच्या प्रयत्नात होता. इंगळे याने बदल्यांसाठी अनेक कागदपत्रांची अदलाबदल केली असून त्याचे पुरावे मिळाले आहेत.
इंगळे आपल्या सहकारी यांच्याशी चर्चा करताना सांगत होता की, पोलीस आयुक्त यांच्या मुलाच्या वाढदिवसाला त्याला 10 ग्राम सोन्याची अंगठी कामाच्या मोबदल्यात देण्यात आली. सर सर्वसाधारणपणे इंगळे हा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदली संदर्भात रोख 35 ते 40 लाख घेत असे फोन सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक केशव राऊत यांच्या बदलीसाठी तो 50 लाख घेणार आहे.
कथित बदली प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव आले आहे. सीबीआयच्या पथकाने इंगळे याच्या घरी छापा मारला मात्र तो घरी नसल्याने पथकाने त्याच्या आईची चौकशी केली.