सिंहासन पुजा सुरु होणार – तुळजाभवानी मातेच्या सकाळी व सायंकाळी अश्या असणार पुजा
तुळजापूर – समय सारथी, कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पुजा सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओंबासे यांनी घेतला असून या सिंहासन पुजा 21 ऑक्टोबर पासून सुरु होतील. सकाळी 6 ते 10 या वेळेत 5 तर सायंकाळी 7 ते 9 या वेळेत 2 अश्या रोज 7 सिंहासन पुजा करण्यात येणार असून याची नोंदणी मंदिर संस्थांनच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. कोरोना संकटानंतर या पुजा बंद होत्या तब्ब्ल अडीच वर्षानंतर आता सिंहासन पुजा सुरु होणार असल्याने भाविकात व पुजाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.
तुळजाभवानी देवीच्या श्रीखंड सिंहासन पूजेसाठी 1 हजार 1 तर दही सिंहासन पूजेसाठी 901 इतके शुल्क आकारण्यात येणार असून भाविकाचे कुटुंबातील 11 सदस्यांना आधारकार्ड तपासून गाभाऱ्यात सोडण्यात येणार आहे. विधी व न्याय विभागासह पुरातत्व विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहासन पूजेची नोंदणी करताना आधार क्रमांक अचूक टाकावा लागणार आहे व तो सोबत आणावा लागणार आहे. पुजारी यांनी स्वतःच्या नावाने सिंहासन पुजा नोंदणी केल्यास त्याच कुटूंबातील व्यक्तींना सोडण्यात येईल, त्यांच्या ऐवजी भाविकांना सोडण्यात येणार नाही.
कोरोना काळापूर्वी ज्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने सिंहासन पुजा नोंदणी केलेली आहे अशा 120 सिंहासन पुजा दररोज सकाळी 3 व सायंकाळी 1 अश्या पद्धतीने करता येईल तत्पूर्वी सदरील भाविकांनी 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे धार्मिक कार्यालयात ऑनलाईन केलेली सिंहासन पूजेची नोंद दाखवून रजिस्टरमध्ये पुढील तारखेची नोंद करुन घ्यावी, त्यामुळे पुन नोंद केलेल्या तारखेलाच सिंहासन पुजा करणे बंधनकारक राहील. या कालावधीत नोंद न केल्यास पूर्वी केलेली नोंदणी रद्द समजली जाईल असे मंदिर प्रशासनाने कळविले आहे.