सावळा गोंधळ – जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या चौकशीची गरज
शोषखड्डे, घरकुल, शेवगा लागवड, मातोश्री पानंदचे ऑडिट आवश्यक – मग्रारोहयो चर्चेत
पोलखोल जबाब – शेवगा लागवड घोटाळाप्रकरणी चौकशीला सुरुवात
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समितीतील विविध योजनाच्या घोटाळ्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशीची गरज कारण तिथेही अश्याच स्वरूपाचा सावळा गोंधळ आहे.शोषखड्डे, घरकुल, शेवगा लागवड, मातोश्री पानंदसह अन्य योजनाचे सोशल ऑडिट आवश्यक आहे. मग्रारोहयो योजनेत अनेक गैरप्रकार असल्याने ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या विशेष लेखापरीक्षण व मग्रारोहयोच्या जिल्ह्यातील सर्व कामांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान शेवगा लागवड घोटाळा प्रकरणी चौकशीला सुरुवात झाली असून 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व कागदपत्रे जमा करण्याचे आदेश चौकशी समिती अध्यक्ष डॉ योगेश खरमाटे यांनी दिले आहेत. शेवगा लागवड प्रकरणात प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे. शोषखड्डे घोटाळा प्रकरणात काही जणांनी रोहयो उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्याकडे भ्रष्ट टोळीचा पोलखोल करणारे जबाब दिले आहेत.
शेवगा लागवड योजनेत लाभार्थी निवड करताना पंचायत समितीमधील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन निवड केली त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना खरच गरज आहे ते या योजनेपासून वंचित राहिले. पाहणी न करता कार्यारंभ व मंजुरी आदेश देण्यात आले. प्रत्यक्ष लागवड केलेली नसताना अनुदान देण्यात आले. अश्या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी दखल घेत समिती नेमली आहे. या समितीत अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, उस्मानाबाद तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, कृषी सहायक सुमित सोनटक्के व रोहयो जिल्हा समन्वयक सुनील जमादार यांचा समावेश आहे.
उस्मानाबाद तालुक्यात 2021-22 या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत मार्फत किती फळबाग व शेवगा लागवड प्रस्ताव प्राप्त झाले, त्यापैकी किती प्रस्तावना तांत्रिक मान्यता कधी देण्यात आली व झालेला विलंब आणि जबाबदार अधिकारी यासह प्रशासकीय व तांत्रिक मान्यतामधील अंतर,किती हजेरीपत्रक शून्य रकमेने देण्यात आली त्याचे कारण व जबाबदार अधिकारी यांचा अहवाल मागितला आहे. कुशल देयकाची मागणी माहिती, पैसे घेत असल्याच्या तक्रारीची सत्यता, प्रलंबित प्रस्ताव, लागवड न करता अनुदान उचलेल्या प्रकरणांची ग्रामपंचायत निहाय माहिती देऊन जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
उस्मानाबाद तालुक्यात सन 2021-22 या आर्थिक वर्षात पंचायत समिती अंतर्गत शेवगा लागवडीची 126 तर 2022-23 या चालू वर्षात 28 कामे करण्यात आली. त्यात अकुशल कामावर 1 कोटी 61 लाख तर कुशल कामावर 16 लाख 24 हजार असा 1 कोटी 77 लाख खर्च करण्यात आले तर चालू वर्षी 9 लाख 53 हजार खर्च केले. एकंदरीत या शेवगा योजनेवर 1 कोटी 87 लाख खर्च करण्यात आले.
उपळा, मेडसिंगा व बेंबळीचे सरपंचाना क्लीन चिट
मेडसिंगा, बेंबळी व उपळा येथील गावपुढारी असलेल्या सरपंच यांची कुठेही सही नसल्याने त्यांना या घोटाळ्यात सहभाग नसल्याचे सांगत क्लीन चिट देण्यात आली आहे. अनियमिततेस जबाबदार असलेल्या ग्रामसेवक ए व्ही आगळे व एस बी सुर्वे यांना 7 सदस्य असलेल्या पडताळणी समितीने अहवाल देत दोषी ठरविले आहे त्याच्यावर कारवाई प्रस्तावित आहे.
पोलखोल जबाब –
पालक तांत्रिक सहायक स्वाती कांबळे यांनी त्याच्या जबाबात अनेक पोलखोल करणारे खुलासे केले असून या योजनेत कोणी काय काय केले हे पुराव्यासह दिले आहे. दुसऱ्याच व्यक्तीकडून काही कागदपत्रे करुन घेतली असे म्हणटले आहे त्यामुळे ती व्यक्ती कोण याची चर्चा रंगली आहे.