सावंत शिवसेनेतच, आम्ही त्यांच्या पाठीशी – राष्ट्रवादी व काँग्रेसकडून खच्चीकरण
समर्थन मोहीम – शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडल्या पत्रातून व्यथा
उस्मानाबाद – समय सारथी
भूम परंडाचे आमदार डॉ तानाजीराव सावंत हे अद्याप शिवसेनेतच आहेत त्यांनी पक्ष सोडलेला नाही व ते पक्ष सोडणार नाहीत असे स्पष्टीकरण देत सावंत यांच्या समर्थनार्थ मतदार संघातील पदाधिकारी रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता साळुंके यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. आम्ही सावंत यांच्या पाठीशी आहोत ते शिवसेनेतच आहेत मात्र सत्ता असताना गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी व काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक खच्चीकरण केले गेले असे सांगत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रातून व्यथा मांडल्या आहेत.
प्रसिद्धी पत्रकात म्हणटले आहे की, गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसकडून शिवसेनेला दाबन्याचा प्रयत्न चालू आहे. अशा स्तिथीत आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या प्रामुख्याने राष्ट्रवादी व काँग्रेस या प्रतिस्पर्धी पक्षाच्या विरोधात लढावयाच्या आहेत.
आमचा मुख्यमंत्री असताना सुद्धा महत्वाची सर्व खाते राष्ट्रवादी व काँग्रेसकडे असल्याने आम्हा शिवसैनिकांची जी अडचण होती ही कोणालाही सांगता येत नव्हती. मुख्यमंत्री हे आमच्या पक्षाचे असल्यामुळे काही बोलता येत नव्हते. सावंत यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे, सावंत यांनी किंवा आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही व सोडणार नाही. ज्यांच्या बरोबर वयाच्या 22 वर्षांपासून झगडत राहिलो, पोलिस केस झाल्या, तुरुंगवास भोगला त्यांचे बरोबर आज सत्तेत सामील होण्याची वेळ आली.
पक्षप्रमुख मुख्यमंत्री होत आहेत म्हणटल्याने ते सुद्धा आम्ही मान्य केले परंतु गेल्या अडीच वर्षात शिवसैनिकांवर झालेला अन्याय आता सहन करणे शक्य नाही. सावंत यांनी सामान्य शिवसैनिक यांना न्याय देण्याचे काम केले आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे सावंत यांच्या भूमिकचे मी जाहीरपणे समर्थन करतो.