सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी 22 हजार लाचेची मागणी – तलाठी विरुद्ध गुन्हा नोंद, धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई
धाराशिव – समय सारथी
सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी 22 हजार रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी परंडा तालुक्यातील अनाळा येथील तलाठी महेश मुकादम विरोधात पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धाराशिव लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली असुन तलाठ्याने लाचेची मागणी केली मात्र संशय आल्याने लाच स्वीकारली नाही त्यामुळे लाचेच्या मागणीचा गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार यांचे वडिलांचे नावे शेत जमिनीचा फेर घेऊन ऑनलाईन सातबाऱ्याला नोंद घेण्यासाठी 22 हजार 500 रुपयाची लाच मागणी करुन 22 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर तक्रारदार यांच्या वैक्तिक अडचणीमुळे पुढील कारवाई थांबविण्यात आली होती. तक्रारदार यांनी पुन्हा कळविल्यावरून सापळा कारवाई केली असता, तलाठी मुकादम यांना संशय आल्याने लाच रक्कम स्वीकारली नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तलाठी यांचे विरुद्ध भुम तालुक्यातील अंबी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक सिद्धराम मेहेत्रे सिद्धाराम महेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांनी काम पहिले. सापळा पथकात पोलीस अमलदार सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य यांचा समावेश होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.