सांजा चौकातील मोहिते खून प्रकरण – या तीन आरोपींची गुन्ह्यातून मुक्तता – ऍड अमोल वरुडकर यांची माहिती
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील सांजा चौक येथील भर दिवसा झालेल्या बहुचर्चित रामेश्वर मोहिते खुन प्रकरणात कोर्टाने 3 जणांची गुन्ह्यातून मुक्तता केली असल्याची माहिती ऍड अमोल वरुडकर यांनी दिली आहे.नारायण नागनाथ डोंगरे, अक्षय रामहरी पडवळ व काका मारुती सुर्यवंशी यांचा गुन्ह्यात कोठेही संबंध येत नसल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला त्यामुळे त्यांची यातून मुक्तता करण्यात आली. रणजीत सुभाष सुर्यवंशी, सागर रामहरी पडवळ यांच्या विरोधात पर्याप्त पुरावा असल्याने खुन खटला कोर्टात चालणार आहे.
सांजा चौक येथे मोहिते या तरुणाचा धारदार शस्त्राने दोन्ही हात धडा वेगळे करून 26 एप्रिल रोजी खून केला होता. याप्रकरणी संशयित 5 आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र आरोपींचे मोबाईल लोकेशन व घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्यातील सहभाग निश्चितीची मागणी विधीज्ञ अमोल वरुडकर यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचा आदेश केला होता.
पोलीस तपास अहवालामध्ये त्या 5 आरोपींपैकी 3 आरोपींचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्या 3 आरोपींची गुन्ह्यात सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांची गुन्ह्यातून मुक्तता केली असल्याची माहिती विधीज्ञ अमोल वरुडकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहरातील सांजा चौकात भर दिवसा सांजा येथील रामेश्वर किसन मोहिते यांचा मागील शेतीच्या भांडणावरून 26 एप्रिल 2023 रोजी धारदार शस्त्राने दोन्ही हात धडा वेगळे करीत खून करण्यात आला होता. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये कलम 302,143 व 148 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खून झाला त्या दिवशीच पोलिसांनी नारायण नागनाथ डोंगरे या संशयित आरोपीस अटक करुन दुसऱ्या दिवशी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळी विधीज्ञ अमोल वरुडकर यांनी आरोपींच्या सहभागाबाबत मोबाईलचे लोकेशन व घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या प्रकरणात आरोपींचा सहभाग आहे किंवा नाही याची पडताळणी पोलिसांमार्फत करावी ? अशी मागणी एका अर्जाद्वारे न्यायाधिशांकडे केली होती. त्यानंतर रणजीत सुभाष सुर्यवंशी, सागर रामहरी पडवळ, अक्षय रामहरी पडवळ व काका मारुती सूर्यवंशी या आरोपींना अटक करण्यात आली होती.
खुनाच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत संपूर्ण तपास करून न्यायालयात नारायण नागनाथ डोंगरे, अक्षय रामहरी पडवळ व काका मारुती सुर्यवंशी यांचा गुन्ह्यात कोठेही संबंध येत नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यामुळे वरील नमूद तीन आरोपींची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी त्या गुन्ह्यातील सहभागातून मुक्तता केली आहे.
विधीज्ञ वरुडकर यांनी याबाबत न्यायालयात प्रभावीपणे व्यक्तिवाद करीत गुन्ह्यातील सतत्यबाबत वारंवार मागणी केली होती. त्यांना विधीज्ञ किरण चादरे, विधीज्ञ भाग्यश्री कदम व विधीज्ञ वैभव खांडेकर यांनी सहकार्य केले.