धाराशिव – समय सारथी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर द्वारा संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर महाराष्ट्र शासनास हस्तांतरीत करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही होण्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. या समितीत जणांचा समावेश असुन ही समिती हस्तातरण कार्यवाहीसाठी प्रकल्प अहवाल सादर करणार आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी यासाठी बैठका घेत पाठपुरावा केला होता, अखेर या प्रकियेस सुरुवात झाली आहे.
या समितीचे अध्यक्ष किरण बाबुराव लाढाणे, प्र. सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर असणार आहेत. रविंद्र हरिश्चंद्र आडेकर, प्र. प्राचार्य, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर हे सदस्य सचिव असणार असुन डॉ स्मिता दिपक कोकणे, मुख्य लेखा व भांडार पडताळणी अधिकारी, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबईसह अरविंद बोळंगे, तहसिलदार तुळजापूर तथा विश्वस्त सदस्य,डॉ. संजय शामराव डंभारे, प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर हे सदस्य असणार आहेत.
जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या तपासणी सुचीत नमूद बाबींच्या आधारे तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी निर्धारीत केलेल्या बांधकाम, पायाभूत सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ, इत्यादी बाबतची मानके विचारात घेऊन तसेच यासंदर्भातील शासनावर पडणारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आर्थिक भार याचा अभ्यास करुन, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर द्वारा संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरीत करण्याच्या अनुषंगाने सुकरपणे कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प अहवाल समितीस सादर करावा असे आदेशात नमुद केले आहे.