सत्य उघड – खासदार व सर्व आमदार यांना मंत्री सावंताच्या आढावा बैठकीचे निमंत्रणच नव्हते
राजकीय खेळी अपयशी – अट्टहास का ? राजकीय अस्तित्व नाकारल्याने सावंत गटात अस्वस्थता
स्पष्टीकरण – खासदार, आमदार सदैव जनतेच्या संपर्कात, विरोधकांचे आरोप चुकीचे
धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीचे शासकीय निमंत्रण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजीतसिंह पाटील व आमदार कैलास पाटील यांना दिले नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची राजकीय खेळी अयशस्वी झाली असुन ते सपशेल तोंडावर पडले आहेत. दैनिक समय सारथीने संबंधित आमदार यांच्याशी संपर्क साधला असता हे वास्तव समोर आले.
काही सत्ताधारी आमदार पालकमंत्री डॉ सावंत यांचे जिल्ह्यातील राजकीय अस्तित्व मानायला तयार नाहीत, हे अनेक घटनावरून समोर आले तर विरोधी आमदार सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या गटात अस्वस्थता आहे.
जिल्हा प्रशासनातील उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले की, मंत्री सावंत यांनी केवळ अधिकारी यांना बैठकीसाठी बोलावण्यास सांगितले होते, इतर लोकप्रतिनिधी यांना बोलाविन्याबाबत कोणत्याही सुचना मंत्री सावंत यांनी दिल्या नव्हत्या. सूचना असत्या तर आम्ही बोलावले असते.
निमंत्रणच नव्हते त्यामुळे आढावा बैठकीला हजर राहण्याचा प्रश्नाच येत नाही, बैठकीच्या निमंत्रणाचे प्रशासकीय पत्र असेल तर मंत्री सावंत यांनी जनतेला दाखवावे उगाच खोटा कांगावा करू नये. आम्ही कोणाला घाबरत नाहीत, सत्ता की कोणाची मक्तेदारी नाही, जर निमंत्रण दिले असते तर तिथे जाऊन मुद्दे आक्रमकपणे मांडले असते. यापूर्वीही आम्ही बैठकीत आवाज उठवला आहे आणि यापुढेही जनतेच्या हितासाठी लढा देऊ. खासदार आणि आमदार हे सदैव जनतेच्या संपर्कात असून रात्री-अपरात्री लोकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या सोडविण्याचे काम करीत आहेत असा खुलासा शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केला.
मंत्री सावंत हे अमावस्या पौर्णिमेला कधी तरी येतात व बड्या बड्या डिंग्या मारून तेच ते सांगत बडबड गीते गाऊन जातात. सावंत हे मंत्री होण्यापूर्वी आमदार होते त्यावेळी ते अनेक महिने जनतेच्या संपर्कात नव्हते, कोरोनात तर ते गायब होते त्यावेळी खासदार आमदार यांनी जनतेत मिसळून आधार दिला. सावंत हे पैश्याच्या जोरावर बोलतात, लोकांना ते साधे भेटत नाहीत. शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगून त्यांनी केलेल्या आरोपाचे खंडण शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केले.
खासदार हे सध्या दिल्ली येथे अधिवेशनात आहेत तर आमदार कैलास पाटील हे जनतेत मिसळून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या सोडवित आहेत.जिल्ह्याचे खासदार, आमदार आढावा बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यामुळे त्यांच्याकडून सर्वसामान्य माणसाची कामे होत नाहीत, असा आरोप चुकीचा आहे. रात्री त्यांना कुठल्याही नंबर वरून कोणीही फोन केला तर ते फोन घेऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेत सोडवतात.
कोरोना काळात पालकमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये आमदार म्हणून किती बैठका घेतल्या? किती वेळेस ते आले? कोविड काळात मतदारसंघातील किती लोकांची भेट घेतली? याचेही उत्तर द्यावे. कोविड काळामध्ये खासदारांनी स्वतः कोविड सेंटर सुरू करुन लोकांची काळजी घेतली, हे सर्व जनतेला माहीत असल्याचे गुरव यांनी म्हटले आहे.
सावंत हे व्यापारी असुन ते राजकारणाच्या माध्यमातून व्यवसाय करतात.जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ अर्थात जेएसपीएम हे स्वतंत्र विद्यापीठ मंजुर करुन घेतले जे की पुणे येथे होणार आहे. लोकांची समाजसेवा, दानशूर, मदत केल्याचा व कळवळा असल्याचे दाखवतात. त्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांनी स्वतःच्या व्यवसायासाठी सत्तेचा कसा वापर केला हे योग्य वेळी पुराव्यासह जनतेसमोर मांडू असे गुरव म्हणाले. अमर अकबर, ऍंथोनी असे आम्हाला म्हणत आहेत मात्र मंत्री सावंत हे स्वतः बोलबच्चन आहेत हे विसरू नये असे गुरव म्हणाले.