सत्ता संघर्ष पेटला – युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांना काळे झेंडे दाखवून निषेध
आमदार कैलास पाटील यांच्यावर जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांचा पलटवार, योग्य ती जागा दाखवू
उस्मानाबाद – समय सारथी
युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. युवासेनेचे जिल्हा प्रमुख तथा विस्तारक अक्षय ढोबळे यांच्या घरात पाहुणचार घेण्यासाठी सरदेसाई आले असता ते परत जाताना त्याना शिवसेनाच्या शिंदे गटाकडून काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.
वरुण देसाई हे खरे गद्दार आहेत, बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारना कोणी केली हे त्यांना चांगले ठाऊक आहे. हप्तेखोर वरुण सरदेसाई यांचा निषेध केला त्याचे जिल्हा प्रमुख सूरज साळुंके यांनी समर्थन केले.
आमदार कैलास पाटील खोटं बोलत आहेत त्यांच्यावर कोणाचाही दबाव नाही. 170 आमदारांचे सरकार स्थापन झाले आहे, राज्याचे दबंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आहेत. आमदार कैलास पाटील यांची आम्हाला कोणत्याही प्रकारची गरज नाही ज्या वेळी सत्तास्थापन करताना त्यांची गरज होती त्यावेळी आमदार कैलास पाटील हे पळून गेले ते खोटे बोलत आहेत, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी केला आहे. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत आमचा व त्यांचा सामना होणार आहे, त्यात त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवून देऊ असा इशारा साळुंके यांनी दिला.
शिवसेना सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आजही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. कधी अमिषे ऑफर देत आहेत तर कधी दबाव टाकून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. कितीही ऑफर आल्या दबाव आला तरी शिवसेना सोडणार नसल्याचा खुलासा आमदार पाटील यांनी केला, त्यावर साळुंके यांनी पलटवार केला. आगामी काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम परंडा, उस्मानाबाद, उमरगा या भागात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे दौरा करणार आहेत त्यामुळे सत्ता संघर्ष शिगेला पेटणार आहे.
आमदार कैलास पाटील यांनी अर्ध्या वाटेतून कोणत्या ऑफरवर परत आले हे सांगावे असा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख अजित लाकाळ यांनी केला.
ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवसैनिकांच्या बोकांडी बसणाऱ्या आमदारांनी ते अर्ध्या वाटेतून कोणत्या ऑफरवर परत आले, हे सांगावे. त्यांच्या हप्ते खोरीचे किस्से जिल्ह्यात सर्वश्रुत असून अशा लोकांना कदापी सामावून घेतले जाणार नाही. पुढच्या निवडणुकीत यांनी उभे राहून तरी दाखवावे, बाळासाहेबांचा कडवट सैनिक यांची अनामत जप्त केल्याशिवाय राहणार नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार पुढे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करत आहेत. राज्यातील जनता त्यांच्या कारभारावर खुश असून अनेक चांगले नेते प्रवेशासाठी इच्छुक आहेत. आ कैलास पाटील यांच्यासारख्या लबाड माणसाला स्थान नाही असा आरोप तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांनी केला आहे.