शेवगा घोटाळा उघड – शेवगा लागवड न करताच वाटले कोट्यावधी, कारवाईकडे लक्ष
विधिमंडळात गाजणार – शोषखड्डे, घरकुल व मातोश्री पाणंद घोटाळ्याबाबत लक्षवेधी व तारांकीत प्रश्न
आयकर व लाचलुचपत विभागाला जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांचे उघड चौकशीचे पत्र
सीआयडी चौकशीची शिफारस – उस्मानाबाद पंचायत समितीच्या सर्व घोटाळ्याच्या एकत्रीत चौकशी होणार
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समितीमधील शेवगा लागवड योजनेच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जवळपास शंभरच्यावर ठिकाणी शेवगा लागवड न करता लाखो रुपये लाभार्थी यांना वाटल्याचे प्रत्यक्ष स्थळ पाहणीत उघड झाले आहे. चौकशी अहवाल लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती असून यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. घरकुल व मातोश्री पाणंद या योजनेत 2 वेगवेगळे गुन्हे नोंद झाले असून यात अधिकारी व मजूर अश्या 16 जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे. दैनिक समय सारथीने हा घोटाळा पुराव्यासह उघड करीत त्याचा विविध स्तरावर पाठपुरावा केला होता त्याला आता यश आले असून सर्व अनुषंगाने कारवाईला सुरुवात झाली आहे. घोटाळेबाज यांच्या विरुद्ध चौकशीचा व कारवाईचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. घोटाळ्याचे बीड व नागपूर कनेक्शन सुद्धा यात रडारवर आहे.
शोषखड्डे, घरकुल व मातोश्री पाणंद घोटाळाबाबत लक्षवेधी व तारांकीत प्रश्न उपस्थित केले असून हा घोटाळा विधानसभा व विधानपरिषद अश्या दोन्ही सभागृहात गाजणार आहे. विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी 1 कोटी 12 लाख रुपयांचा शोषखड्डे घोटाळा लावून धरला असून हा तारांकित प्रश्न 27 डिसेंबरला प्रश्न- उत्तराच्या चर्चेसाठी पाटलावर येणार असून रोजगार हमी मंत्री याचे उत्तर देणार आहेत तर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत झालेल्या गैरव्यवहारबाबत आमदार कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर चर्चा होणार आहे त्यामुळे उस्मानाबाद पंचायत समिती व रोहयो विभागातील घोटाळा राज्यभर चांगलाच गाजणार असून त्यानंतर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. आमदार धस यांनी हा घोटाळा धसाला लावण्याचा निश्चिय केला असून प्रश्न उपस्थित करीत पाठपुरावा करीत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पंचायत समितो व रोहयो विभागाच्या योजनाची एसआयटी चौकशीची मागणी आमदार धस यांनी केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील घोटाळे व अपहराच्या अनुषंगाने काही अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांनी अपहारीत लाखो रुपये हे एका झटक्यात रातोरात भरले त्यामुळे हे पैसे कुठून आले, उत्पन्नाचा स्रोत काय याची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाला जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी उघड चौकशीचे पत्र दिले आहे तर आयकर विभागाला या सर्वांच्या चौकशीचे व कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अपहारीत प्रत्येकी देय असलेली 37 लाख 42 हजार पैकी तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांनी 16 लाख 50 हजार, सहायक लेखाधिकारी लोध यांनी 29 लाख 20 हजार व क्लार्क कम डेटा ऑपरेटर विश्वनाथ राऊत यांनी 30 लाख भरले असून या तिघांसह निलंबित ग्रामसेवक अंगद आगळे, एस व्ही सुर्वे, तांत्रिक सहायक स्वाती कांबळे, राकेश सगर व सचिन वीर या सर्व 8 जणांची लाचलुचपत विभाग मार्फत अपसंपदा प्रकरणी उघड चौकशी करावी आणि याचे आजवरचे उत्पन्न व भरलेला वार्षिक आयकर याची चौकशी आयकर विभागाने करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी दिले आहेत. उत्पन्न पेक्षा या लोकांकडे असलेली अधिकची संपत्ती यनिमित्ताने उघड होणार आहे.
सर्व घोटाळ्यांची एकत्रित सीआयडी चौकशीची शिफारस जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केली असून त्याबाबत पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांना दिले आहेत. घरकुल घोटाळ्यात चक्क एका शासकीय कर्मचारी याला मजूर दाखविण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी गुन्हे नोंद करण्याच्या आदेशाच्या पत्रात सीआयडी चौकशीची शिफारस केली आहे. उस्मानाबाद पंचायत समितीच्या सर्व घोटाळ्याच्या एकत्रीत चौकशी झाल्यावर घोटाळ्याचा आकडा किमान 6-7 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. मातोश्री पाणंद योजनेत गुन्हा नोंद झाला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या घोटाळ्यात आजवर गुन्हे नोंदसह निलंबन, काळ्या यादीत टाकणे अशी कारवाई झाली आहे त्यामुळे हे प्रकरण आता सीआयडीकडे कधी वर्ग होते हे पाहावे लागेल.