शिवसेनेत गटबाजी ? पालकमंत्री गडाख यांचा उद्या उस्मानाबाद दौरा
आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या कोरोना केंद्र उदघाटन कार्यक्रमाला दौऱ्यात ‘वेळ व स्थान’ नाही
1 हजार बेडचे जम्बो कोविड केअर सेंटरचे उद्या बार्शीत उदघाटन
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना पक्षात पुन्हा एकदा गटबाजीचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे माजी मंत्री आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत यांनी बार्शी येथे सुरू केलेल्या 1 हजार बेडच्या कोविड केअर सेंटरच्या उदघाटन सोहळ्यास उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी बगल दिली आहे. पालकमंत्री गडाख याचा उद्या उस्मानाबाद जिल्ह्याचा अधिकृत दौरा आला असून या दौऱ्यात सावंत यांच्या कार्यक्रमाला ‘ वेळ व स्थान ‘ देण्यात आले नाही तर यानिमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार आमदार या कार्यक्रमाला जाणार का ? याची चर्चा होते आहे.
पालकमंत्री गडाख हे उद्या सकाळी 10 वाजता तुळजापूर येथे तुळजाभवानी 124 भक्त निवास येथील कोरोना केअर केंद्राचे ऑक्सिजन पुरवठा लाईनचे लोकार्पण करणार आहेत त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे लसीकरण केंद्रास भेट, 11 वाजता चोराखळी येथील धाराशिव साखर कारखाना येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची पाहणी व त्यानंतर 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे येतील. या दौऱ्यात सावंत यांच्या कार्यक्रमाला स्थान देण्यात आले नाही . बार्शी येथील कार्यक्रम 2 दिवसापासून पूर्वनियोजित आहे तरीही त्याचा उल्लेख नाही .
पालकमंत्री गडाख उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याने जिल्ह्यातील खासदार आमदार गडाख यांच्यासोबत पाहणी करणार की बार्शी येथे कार्यक्रमाला हजेरी लावणार याची चर्चा होत आहे.
उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची व्यवस्था व्हावी यासाठी बार्शी येथे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे माजी जलसंधारण मंत्री तथा शिवसेनेचे आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने 1 हजार बेडचे संपूर्ण आरोग्य सेवा मोफत देणारे जम्बो कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून त्याचे उदघाटन व सुरुवात उद्या 7 मे पासून होणार आहे. शिवसेनेचे नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते 7 मेला दुपारी 12.31 वाजता होणार आहे. सोलापूर प्रशासनाकडे मंत्री शिंदे यांचा दौरा आला आहे.
‘या’ सुविधा मिळणार
या कोविड सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असणार आहे व औषधेंसह अन्य उपचार संपुर्णपणे मोफत असतील. एक्स रे , कोविडच्या अनुषंगाने उपचार करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या 8 रक्त तपासणी मोफत केल्या जाणार आहेत. 2 वेळेस जेवण चहा , नाश्ता तसेच प्रशिक्षित योगा शिक्षकद्वारे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, प्रत्येक 3 रुग्णास शक्य आहे तो पर्यंत स्पेशल रूम देण्यात येणार आहे.