शिवसंपर्क अभियान – शाखाप्रमुखांना उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
आघाडी किंवा युतीची चिंता करू नका, जनतेची कामे करा
विविध शासकीय योजना व धान्य वाटप माहिती घेणार, जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांची माहिती
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसंपर्क’ मोहीमेची घोषणा केली असून येत्या सोमवारपासून म्हणजे 12 जुलैपासून राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे. शाखाप्रमुखांना यात मोठी जबाबदारी देण्यात आली असून शिवसैनिक प्रत्येक घराघरात जाऊन लोकांनी लस घेतली की नाही, प्रत्येक गावात कोरोना संकटात देण्यात आलेले मोफत धान्य व शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहचले का नाही याची माहिती शिवसैनिक घेणार आहेत.सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन प्रत्येक पंचायत समिती गण स्तरावर जाऊन शिवसंपर्क अभियान व्यापक स्वरूपात राबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती उस्मानाबादचे शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील यांनी दिली. शिवसंपर्क अभियानातून जनतेचे प्रश्न व पक्ष संघटना बांधणी केली जाणार असुन त्यात पक्ष सदस्य नोंदणीसह नवीन मतदार नोंदणी केली जाणार आहे अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.आघाडी किंवा युतीची चिंता तुम्ही करू नका,फक्त जनतेची कामे करा असे आवाहन या बैठकीत ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी येत्या 12 ते 24 जुलैपर्यंत शिवसंपर्क मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. या मोहिमेअंतर्गत “माझं गाव, कोरोना मुक्त गाव” करण्यासाठी शाखाप्रमुखांनी प्रत्येक घराघरात जाऊन लसीकरण झाले की नाही याची माहिती घ्यावी. इतर काही अडचणी आहेत का? विकासात्मक योजना त्यांच्या पर्यंत पोहचत आहेत की नाही, याचीही माहीती घ्या, असे आदेश दिले.
तुम्ही आघाडी किंवा युती होणार का…? याची चिंता करू नका… तुम्ही कोरोना काळात जशी जनतेची कामे केली तशीच फक्त जनतेची कामे करा. शाखाप्रमुखांनी प्रत्येक गाव करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा. आता आपण सत्तेत असल्याने शाखाप्रमुखांनी शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी जनतेमध्ये जाऊन कामे केली पाहिजेत. राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा , मी तुमच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्याती जिल्हाप्रमुखांची भेट घेतली. दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागाची बैठक घेतली. गेल्या फेब्रुवारीत शिवसेनेची शिव संपर्क मोहीम जाहीर करण्यात आली होती. ती जाहीर केल्यावर काही दिवसातच कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आली. ही लाट काही प्रमाणत ओसरते आहे किंबहुना नियंत्रणात आहे. त्यामुळे आम्ही ही मोहीम पुन्हा सुरू करत आहोत असे जाहीर केले.
आगामी काळात काही जिल्हा परिषद, महानगर पालिका, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याची पूर्व तयारी, चाचपणी या संपर्क मोहिमेद्वारा करण्याचे ठरवले आहे. येत्या 12 जुलै ते 24 जुलै पर्यंत ही मोहीम राबवली जाईल. त्यानंतर त्याचा अहवाल शिवसेना भवनात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल, असं शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी सांगितले. नंतर त्याचा अहवाल शिवसेना भवनमध्ये शिवसेना प्रमुख यांच्या कडे देण्यात येईल. यासोबत माझं गाव, कोरोना मुक्त गाव हे अभियान मुख्यमंत्र्यांनी दिले होत. ते गावपातळीवर पोहचविण्याचे कार्य शिवसैनिक करणार आहे, असेही देसाई यांनी सांगितले.
शिवसंपर्क हे जे अभियान सुरू होत आहे, या अभियानाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आणि संघटनेची बांधणी करण्यात येणार आहे. जिल्हा आणि राज्यस्तरावरचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येणार आहे. शिवसैनिक कधीही कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो यामुळे कोणत्याही तयारीची आवश्यकता नाही. शिवसैनिकांना कार्यक्रम देण्याची गरज नाही. कारण शिवसैनिक चोवीस तास काम करत असतात.