उस गाळप होत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी बोलावली बैठक
उस्मानाबाद – समय सारथी
वेळेत गाळप होत नसल्यामुळे त्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक गुरुवारी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी बैठक बोलावली आहे.
गेल्या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात उसाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मात्र वेळेत गाळप होत नसल्यामुळे अनेक ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. मोठ्या कष्टाने पिकवलेला ऊस कारखान्यांनी न्यावा यासाठी ते या कारखान्यामधून त्या कारखान्यात खेटे घालत आहेत. कारखानदारांकडून त्यांना दिलासा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. आपला ऊस कारखान्याला जाईल का ? या विवंचनेत शेतकरी असून कारखान्यांकडून राबविण्यात येत असलेला ऊस तोडणी कार्यक्रम हा संभ्रम निर्माण करणारा आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेऊन त्या मार्गी लावण्याबाबत, कार्यपद्धती ठरविण्याच्या अनुषंगाने 24 फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अर्जासह उपस्थित रहावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. ऊस समस्येवर मार्ग काढण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.