विशेष मोहीम हाती – वक्फ व देवस्थानला दिलेल्या इनामी जमिनीच्या माहितीचे संकलन
प्राथमिक आकडा , 21 हजार 500 एकरपेक्षा अधिक जमीन इनामी
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे सर्व तहसीलदार यांना आदेश
अनेक जमिनीवर अतिक्रमण व बेकायदेशीर हस्तांतरण
महिनाभरात सर्व माहिती गोळा करून कारवाईची मोहीम
काही इनामी जमिनीला कुळ तर काहींची खरेदी विक्री
हेराफेरी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी यांची होणार पोलखोल
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात वक्फ व विविध देवस्थानला दिलेल्या इनामी जमिनीच्या माहिती व सद्य स्तिथीचे संकलन करण्याची विशेष मोहीम जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हाती घेतली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना याबाबत 14 मुद्यांची माहिती मागवली असून अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले- डंबे या समन्वय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. वक्फ व विविध देवस्थानला दिलेल्या इनामी जमिनी सध्या कागदोपत्री कोणाच्या मालकीच्या व कोणाच्या प्रत्यक्ष ताब्यात आहेत याची सविस्तर माहिती घेतली जात असून त्यानंतर त्या सरकारच्या ताब्यात घेण्याबाबत मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांच्या काळात असा प्रयत्न झाला मात्र त्यानंतर हा विषय मागे पडला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, वाशी, कळंब, उमरगा, तुळजापूर,लोहारा,उस्मानाबाद व परंडा या आठ तालुक्यात अनेक ठिकाणी देवस्थान व वक्फच्या जमिनी आहेत. या जमिनीची तालुका, गाव ,सर्व्हे नंबर, गट क्रमांक, क्षेत्र निहाय माहिती संकलन सुरु आहे. इनामी जमीन या मदतमाश इनाम आहेत की खिदमतमाश आहेत ? सदर जमिनीची नोंद वक्फच्या राजपत्रात आहे काय ? नसल्यास त्याची कारणे ? जमिनीचे हस्तांतरण कोणत्या प्रकारे करण्यात आले ? जमिनीवर सध्या ताबा कोणाचा असून त्यावर अतिक्रमण झाले आहे का ? जमिनीची सद्य स्तिथी व त्यावर काय कारवाई केली पाहिजे असा शेरा देत माहिती संकलन सुरु आहे. येत्या महिनाभरात ही माहिती गोळा केली जाईल व त्यानंतर त्या जमिनी ताब्यात घेण्याची व इतर कायदेशीर कारवाई केली जाईल.
राजपत्राच्या व मुंतखदच्या प्रती संकलित करून त्यानंतर महसूली अभिलेखांच्या आधारे विहित नमुन्यात माहिती संकलित केली जाणार आहे. मुंतखदमध्ये असलेल्या नोंदी राजपत्रातील नोंदीशी पडताळून घेतल्या जाणार आहेत. राजपत्रातील नोंदी तहसील कार्यालयातील महसूल अभिलेख, 1958 पासूनचे 7/12 उतारे, क व ड पत्रक, खासरापत्रक , पाहणी पत्रक, इनाम जमिनीची नोंदवहीमध्ये आहेत का? याची तपासणी होणार आहे. त्यानंतर खासगी जमिनी वक्फ मालमत्तेत कशा समाविष्ट झाल्या याबाबतचे अभिलेख तपासणी केली जाणार आहे. माहिती संकलित करताना उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार यांनी क्षेत्रीय भेटी देऊन अभिलेख यांची खात्री अपेक्षित आहे. सर्व अभिलेखाच्या प्रमाणित प्रती माहिती सोबत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे यांनी या बाबतचे पत्र काढले आहे.
प्राथमिक व जुन्या उपलब्ध आकडेवारीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 तालुक्यात 8 हजार 670 हेक्टर म्हणजे जवळपास 21 हजार 500 एकर पेक्षा अधिक जमीन इनामी आहे. यात सर्वाधिक जमीन उस्मानाबाद तालुक्यात 3 हजार 94 हेक्टर आहे तर उमरगा तालुक्यात 913 हेक्टर, भूम तालुक्यात 392 हेक्टर, तुळजापूर तालुका 1 हजार 963, वाशी 148, लोहारा 361, परंडा तालुक्यात 1 हजार 439 हेक्टर तर कळंब तालुक्यात 356 हेक्टर जमीन अशी 8 हजार 670 हेक्टर जमीन इनामी आहे. हे एकदा प्राथमिक असून यात वाढ होऊ शकते.वक्फच्या जमिनीबाबत महसूल
उस्मानाबाद जिल्ह्याचा बहुतांश भाग हा पूर्वी निजाम राजवटीत होता तसेच नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण होते. अनेक हिंदू मुस्लिम राजे राजवाडे यांनी देवस्थान, देवीच्या, दर्गाहमधील सेवा, धार्मिक विधी करण्यासाठी हजारो एकर जमीन इनामी दिली आहे. या जमिनी आता मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्यांची किंमत कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे. अनेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे तर काही जमिनी बेकायदेशीररित्या हस्तांतरीत झाल्या आहेत. जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी ही विशेष मोहीम हाती घेतल्याने जमिनीची सद्य स्तिथी कळणार आहे ? त्यानंतर त्या ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक देवस्थानसह व दर्गाहच्या नावावर हजारो एकर जमिनी आहेत. काही इनामी जमिनीला कुळ लागले आहे तर काही जमिनी खरेदी विक्री झाल्या असून यात महसूल विभागातील काही अधिकारी सहभागी आहेत, त्यांची पोलखोल या मोहिमेने होणार आहे. माहिती संकलनाच्या मोहिमेनंतर भूमाफियाचे धाबे दनानणार आहे.