विकासपर्व – परंडा येथे स्वतंत्र स्त्री रुग्णालय, भुम येथे उपजिल्हा रुग्णालय तर अनाळा येथे ट्रामा केअर सेंटर होणार
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या आदेशानंतर आरोग्य यंत्रणेचा प्रस्ताव सादर, पहिल्या टप्प्यात 117 कोटींची कामे
उस्मानाबाद – समय सारथी
आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी मंत्री झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील व त्यांच्या मतदारसंघात विकास कामे सुरु करण्याचा श्रीगणेशा केला असुन वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयनंतर आता अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या आदेशानंतर आरोग्य यंत्रनेने प्रस्ताव सादर केले आहेत. सावंत हे आरोग्य मंत्री झाल्यानंतर केवळ 15 दिवसात प्रस्ताव तयार करून घेतले व सरकारकडे सादर करण्यात आले आहेत.
वाशी येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयचे श्रेणीवर्धन करून 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयनंतर आता परंडा येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय परंडाचे श्रेणीवर्धन करून 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे त्याच बरोबर परंडा येथे 100 खाटांचे नवीन स्त्रीरुग्णालय होणार आहे.प्राथमिक केंद्र अनाळा ता.परंडा येथे ट्रामा केअर सेंटर सुरू होणार असुन याबाबतचे प्रस्ताव सादर करणाऱ्याचे आदेश दिले आहेत. 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालय भूमचे श्रेणीवर्धन करून 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे.आरोग्य सुविधांसाठी एकूण 117.27 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.
भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असुन या भागातील आरोग्याचा व विकासाचा वर्षानुवर्षे राहिलेला बॅकलॉग आता भरण्यास सुरुवात झाली आहे. या भागातील लोकांना आता चांगल्या रुग्णसेवा मिळणार आहेत.
मंत्री सावंत आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर असुन ते आज रात्री 7.30 वाजता उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयास भेट देणार आहेत. यावेळी जिल्हा रुग्णालय व जिल्ह्यातील रुग्ण व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत