वाढता कोरोना प्रादुर्भाव – पंतप्रधान मोदी साधणार उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
मृत्युदर, लसीकरण, वाढता प्रादुर्भाव यावर करणार चर्चा
उस्मानाबाद – समय सारथी
देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. येत्या 20 मे रोजी व्हिडीओ कॉन्सफन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी संवाद साधतील. मोदी हे महाराष्ट्रासह 10 राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधतील यात उस्मानाबाद जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. मोदी संवाद साधणाऱ्या 54 पैकी 17 जिल्हे हे एकट्या महाराष्ट्रातील असून यावरून राज्यातील कोरोनाच्या वाढत्या स्तिथीचा अंदाज येऊ शकतो. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड,परभणी, जालना या 5 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांचा या संवाद सत्रात समावेश असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासोबत विडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.अहमदनगर,बुलढाणा,चंद्रपूर ,सातारा,नाशिक,बीड,परभणी,सांगली,अमरावती,जालना,वर्धा,सोलापूर,पालघर,उस्मानाबाद,लातूर,कोल्हापूर व नागपूर या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा रुग्ण सापडण्याचा दर हा 36.55 टक्के,रुग्ण बरे होण्याचा दर 84.35 टक्के तर मृत्यू दर हा 2.28 टक्के आहे तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज सरासरी 700 ते 800 रुग्ण सापडत असुन रुग्ण सापडण्याची साखळी तुटताना दिसत नाही तसेच मृत्युदर वाढता असून मृत्यूचे आकडे जुळत नाहीत. जिल्ह्यात कोरोना व सारीने थैमान घातले आहे तर ऑक्सिजन, औषधे व लसीचा तुटवडा कायम आहे यावर चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी 20 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यात ते वाढता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करावेत, कोरोना लसीकरण कसे वाढवू शकतो, याशिवाय विविध विषयांवर संवाद साधतील.
*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना स्तिथी*
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 2 लाख 53 हजार 652 नमुने तपासले त्यापैकी 47 हजार 399 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 36.55 टक्के आहे. जिल्ह्यात 39 हजार 774 रुग्ण बरे झाले असून 84.35 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 1078 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.28 टक्के मृत्यू दर आहे तर साप्ताहिक मृत्यूदर हा मराठवाड्यात सर्वाधिक 2.40 च्या जवळपास आहे तर 13 मे रोजी जिल्ह्यात 6 हजार 717 सक्रिय रुग्ण आहेत.
*सुपर स्प्रेडर सुसाट असल्याने संसर्ग कायम*
उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागात कोरोना सुपर स्प्रेडर सुसाट आहेत तर गृहविलगीकरण केलेले अनेकजण मोकाट असल्याने कोरोना संसर्ग कसा व कधी कमी होणार ? जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत या पॉझिटिव्ह रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक मित्र परिवार खुलेआम व सर्रास दवाखान्यात ये जा करीत असल्याने हा गट मोठा सुपर स्प्रेडर ठरत आहे तर अत्यावश्यज सेवा वगळता अनेक दुकाने छुप्या मार्गाने खुली आहेत तर फळ भाजी किराणा विक्रेते यांच्यासह अनेक व्यापारी विक्रेते यांच्या कोरोना टेस्ट झाल्या नाहीत, मास्क विना अनेक नागरिक इथे फिरत आहेत.
*देशाला दिशादर्शक – उस्मानाबादचा लस वाचवा पॅटर्न , श्रेय घेण्याची संधी*
उस्मानाबाद जिल्ह्याला 1 लाख 49 हजार 810 कोरोना लसीचे डोस आले त्यापैकी 1 लाख 52 हजार 561 नागरिकांना डोस देऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेने 100 पैकी 101.84 टक्के लसीकरण करून मराठवाड्यात पहिला नंबर मिळवला आहे. कोरोना लसीचा एकही थेंब उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने वाया जाऊ दिला नाही उलट पुरवठा केलेल्या लस साठा पैकी 2 हजार 751 जणांना अतिरिक्त लस देण्याची किमया प्रशासनाने केली आहे. लसीच्या ज्या बॉटल येतात त्यात कधी कधी 10 डोस ऐवजी 11 तर 12 डोस होतात त्यामुळे 100 टक्के पेक्षा जास्त उदिष्टपूर्ती झाली आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे. बाब पंतप्रधान मोदी यांच्या समोर मांडण्याची एक संधी असून यामुळे देशाच्या लसीकरण मोहिमेला एक कलाटणी देणारी ठरणार आहे व त्याचे श्रेय उस्मानाबाद जिल्ह्याला मिळू शकते.
*एप्रिल महिना संकटाचा ठरला, सारी कोरोना थैमान*
एप्रिल 2021 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात 17 हजार 813 रुग्ण सापडले तर 327 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला ( यात सारीने मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश नाही ) उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सरासरी दररोज 593 रुग्ण सापडले तर दररोज सरासरी 11 जणांचा मृत्यू झाला.