वाघोली ‘मृतदेह’ प्रकरण – दोषींवर कारवाई करा अन्यथा सहकुटूंब उपोषण करणार
जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णाचा मृतदेह अदलाबदल , एकाच महिलेचा 2 वेळा दिला मृतदेह
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णाचा मृतदेह अदलाबदल प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी वाघोली येथील खडके कुटुंबाने केली असून ती मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटूंब आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे तर सरपंच तथा शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख संजय खडके यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन कारवाईची मागणी केली आहे. वाघोली येथील द्वारकाबाई खडके या एकाच महिलेचा 2 वेळा मृतदेह देण्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात घडला होता हा प्रकार पुन्हा घडू नये व कुटुंबातील सदस्यांच्या भावनांशी खेळ होऊ नये यासाठी खडके कुटुंबाने कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान पहिल्यांदा खडके यांना देण्यात आलेला मृतदेह हा बीड जिल्ह्यातील रुक्मिणी पंडित या महिलेचा असल्याचे समोर आले असून त्यांना उपचारासाठी बेड नसल्याने उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते त्यांनतर त्यांचा मृत्यू झाला मात्र त्यांचे पूर्ण कुटुंब कोरोना बाधीत सापडल्याने ते दुःखात असताना असा गंभीर प्रकार घडला आहे. घडलेल्या प्रकाराबाबत अद्याप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे खडके यांचा मुलगा सुरेश खडके व सुन ज्योती खडके यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक याना लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुगणालयाचा भावना शून्य कारभार उघड झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली या गावातील एका 70 वर्षीय वृद्ध महिला द्वारकाबाई खडके यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना दोनदा देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा मृत्यू 4 मे रोजी झाला होता त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांना 5 मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयाने रीतसर प्रक्रिया करून दिला त्यांनतर नातेवाईकांनी 5 मे रोजी त्यांच्यावर वाघोली येथे विधिवत अंत्यसंस्कार केले व 6 मे रोजी त्या आजीचे तिसऱ्या दिवशी राख सावडण्याचा विधी करून नातेवाईक घरी येऊन टेकत नाही तोच पुन्हा एकदा जिल्हा शासकीय रुग्णालयातुन त्या वृद्ध आजीचा मृतदेह घेऊन जा असा फोन आल्यावर नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. जिल्ह्यात कोरोना व सारीचे थैमान असून मृत्यु झालेल्या रुग्णांचे व अंत्यसंस्कार केलेल्या रुग्णांचे आकडे यापूर्वीच जुळेना झालेत त्यात असा प्रकार घडल्याने संशयाला जागा मिळत आहे त्यामुळे या प्रकाराची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी नातेवाईक यांनी केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे जावई असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना व्यवस्था व यंत्रणेचे तीन तेरा झाले असून आमदार लोकप्रतिनिधी याचे दुर्लक्ष आहे.
खडके यांच्या नातेवाईक यांना देण्यात आलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. जिल्हा शासकीय रुग्णालयाने एका बंद पीपीई मृतदेह किटमध्ये मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला त्यावेळी त्यावर द्वारकाबाई यांचे नाव गाव व इतर माहिती एका कागदावर चिटकविण्यात आली. आजीवर कोरोना वॉर्डात उपचार करण्यात आले व त्याच वॉर्डात त्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक यांनी ती किट न उघडता विधिवत अंत्यसंस्कार 5 मे रोजी केले व त्यांनतर दुसरा मृतदेहवर उस्मानाबाद नगर परिषदेने अंत्यसंस्कार केले.
मृतदेहाच्या किटवरील नावाचे पट्टी बदलल्याने हा प्रकार घडला असल्याचे डॉ धनंजय पाटील यांनी सांगितले मात्र असा प्रकार घडल्याने रुग्णालयाच्या कर्मचारी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.