वसुली कारनामा – १० टक्के टोलनंतर आता पोलीस ‘हप्ता’ प्रकरणाची चर्चा
पालकमंत्री गडाख यांच्या नावाने पोलीस अधिकाऱ्यांना मागितला ‘हप्ता’
स्वीय सहाय्यकाच्या कारनाम्याने पालकमंत्री अडचणीत तर शिवसेना बदनाम
उस्मानाबाद – समय सारथी
आघाडी सरकारवर वसुली सरकार अशी टीका होत असताना उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकाच्या वसुली कारनाम्याने शिवसेना चांगलीच चर्चेत आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामासाठी शिवसैनिकांकडून १० टक्के टोल वसुलीच्या कारनाम्यानंतर पीएचा आणखी एक वसुली कारनामा उघड झाला आहे. पालकमंत्र्यांच्या नावाने पोलीस अधिकाऱ्यांना ‘हप्ता’ मागितल्याचे नवे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयातील २ अधिकाऱ्यांसह एका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाना ‘पीए’ नी संपर्क करीत पैसे मागितल्याची माहिती समोर आली आहे तर या वसुली कारनाम्यानंतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांकडूनही ‘टोल’ घेतल्याच्या तक्रारी व्यक्त होत आहेत. त्यामुळे पालकमंत्री शंकरराव गडाख या प्रकरणावरील मौन सोडून भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित आहे. पालकमंत्री यांच्या विश्वासाने लाडावलेल्या पीएच्या टोळीच्या कारनाम्याने गडाख अडचणीत आले आहेत तर शिवसेनेची प्रतिमा बदनाम होत आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीसाठी १० टक्क्याने गोळा केलेला ‘टोल’ पैकी शिवसैनिकांचा टोल परत देण्याचे आदेश खुद्द पालकमंत्री यांनी त्यांच्या सोनाई येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता निधीच्या ‘टोल’ नंतर चक्क पोलीस अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या नावाने ‘हप्ता’ मागितल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे. उस्मानाबाद जिल्हा पोलीस मुख्यालयातील दोन अधिकारी आणि शहर पोलीस ठाण्याचे एका निरीक्षक यांना या संदर्भात संपर्क साधुन मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी पालकमंत्री किंवा अन्य पुढाऱ्यांना ‘हप्ता’ देत नसल्याचे सांगितल्याचे समजते आहे. परंतु पालकमंत्र्यांच्या नावाने चक्क ‘हप्ता’ मागितल्याने पोलीस अधिकारी देखील चक्रावले असून हा नवीन पायंडा आहे. पोलीस अधिकारीच नव्हे तर महावितरण, वनीकरण, वन, वन्यजीव, कृषी, बांधकाम, आरोग्य, महिला, बालकल्याण, ग्रामसडक आदी विभागाच्या अधिकारी, ठेकेदाराकडूनही थेट ‘टोल’ वसुली सुरू असल्याच्या तक्रारी व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे प्राबल्य असून पालकमंत्री, खासदार, ४ पैकी ३ आमदारसह अनेक स्थानिक स्वराज संस्थात सत्ता साम्राज्य आहे. जिल्ह्याचा विकास झाला नाही याचे खापर नेहमी एका कुटुंबाच्या नावाने फोडत धन्यता मानताना शिवसेनेच्या नेत्यांच्या हातात आता सत्ता आहे व सुदैवाने शिवसेना राज्याच्या सत्तेत आहे मात्र दुर्दैवाने या सत्तासाम्राज्याचा उपयोग हप्ते, टोल अर्थात शासकीय निधी देण्यासाठी टक्केवारी, भ्रष्टाचार अशा कामांसाठी अधिक वापरला जात असल्याचे समोर येत आहे.
जिल्हा वार्षिक निधीच्या माध्यमातून तसेच जिल्ह्यासाठी आलेली विविध शासकीय निधीमधून जिल्ह्याचा विकास साधला जातो मात्र हा निधीच टक्केवारी घेवून वाटला जाणार असेल तर नेमका विकास कोणाचा होणार ? तर केवळ गुत्तेदार, ठेकेदार, अधिकारी आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या लोकप्रतिनिधी अर्थात पालकमंत्री, खासदार, आमदार नगराध्यक्ष व इतर लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा…? शिवसैनिक फक्त घोषणाबाजी व लाठ्या काठ्या खायला व आंदोलन करायला समोर लागतो असा संताप काहीजण व्यक्त करीत आहेत. गडाख हे अपक्ष निवडून आले होते त्यांनतर ते शिवसेनेच्या कोट्यातून थेट मंत्री झाले आहेत व त्यानंतर टीका होत असल्याने राजकीय सोयीसाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधले आहे.