वसंतदादा बँक घोटाळा – 9 संचालकांनी केली विजय दंडनाईक यांची पोलखोल
जय लक्ष्मी साखर कारखान्याचे व्यवहार रडारवर – बोगस कर्ज वाटप तर संचालकांना धमकावणे
धाराशिव – समय सारथी
वसंतदादा बँकेच्या करोडो रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याबाबत काही संचालकांनी पोलखोल करीत कारवाई करण्यासाठी जिल्हा उप निंबंधक सहकारी संस्था यांना लेखी पत्र दिले होते त्यात त्यांनी चेअरमन विजय दंडनाईक यांनी कश्या प्रकारे घोटाळा केला याची पुराव्यासह पोलखोल केली होती. विजय दंडनाईक यांनी हे घोटाळा करीत असल्याचे पत्र 9 संचालक यांनी दिले होते, हे संचालक या घोटाळ्याचे प्रमुख साक्षीदार आहेत मात्र आता गुन्हा दाखल झाल्यानंतर ते सुद्धा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.
चेअरमन विजय दंडनाईक यांच्यासह अन्य संचालक फरार असुन आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करीत आहे. फरार आरोपी सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संचालक प्रदीप कोंडीबा मुंडे, हरिचंद्र शेळके, महादेव गव्हाणे, गोरोबा झेंडे, इलाही बागवान, सुरेश पांचाळ, ऍड दयानंद बिराजदार, लक्ष्मण नलावडे व गणेश दत्ता बंडगर या 9 संचालकांनी एकत्रीतपणे बँकेच्या घोटाळ्याची पोलखोल करणारे पत्र पुराव्यासह दिले.
सेव्हिंग खात्यावर ओव्हर ड्राफ्ट उचलणे, कर्जदार यांचे पैसे स्वतः घेणे, नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप करुन ते स्वतः घेणे, थकीत कर्जदारास वसुलीच्या नोटीसा निघू न देणे, वसुलीची कारवाई न होण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव टाकणे, जय लक्ष्मी साखर कारखान्याच्या नावे बँकेचा आर्थिक लाभ घेऊन अफरातफर करणे, बँकेच्या 190 कर्जदार यांच्याकडून कर्ज घेऊन ते न भरणे, बँकेच्या संचालकांनी आर्थिक व्यवहार बाबत विचारले चौकशी केली असता त्यांना धमकावणे, रिझर्व बँकेच्या अhधिकारी यांनी दिलेल्या सूचनाचे पालन न करणे व त्रुटीची पूर्तता न करणे आदी बाबींची लेखी तक्रार खातेदाराचे विवरण, बँकेचा खाते उतारा, जय लक्ष्मी बँकेचा खातेउतारा अशी पुराव्याची कागदपत्रे दिली आहे.
बँकेतील अनेक ठेवीदार व कर्जदार यांची करोडो रुपयांची रक्कम जय लक्ष्मी साखर कारखान्यात नियमबाह्य पद्धतीने वापरल्याचा काही संचालक यांचा लेखी पुराव्यासह आरोप आहे त्यामुळे आगामी काळात कारखान्याचे व्यवहार तपास यंत्रनेच्या रडारवर येऊ शकतात. सध्या फसवणूकीच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.