वक्फ इनामी जमीन घोटाळा – खालसा करून विक्री व प्लॉटिंग
गुन्हा नोंद करा – वक्फ अधिकारी यांनी दिली नळदुर्ग पोलिसात तक्रार
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील जामा मशीद इनामदार गल्ली या वक्फ संस्थेच्या इनामी जमिनीचा घोटाळा बाहेर आला आहे. मशीदला दिलेली इनामी जमीन नियमबाह्यरित्या खालसा करून ती विकल्याचा आरोप आहे, याबाबत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या आदेशानुसार जिल्हा वक्फ अधिकारी यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात संबंधीत व्यक्ती व महसूल अधिकारी यांच्या विरोधात वक्फ अधिनियम 1995 चे कलम 52 (अ) व इतर कलमानव्ये गुन्हा नोंद करण्याची लेखी तक्रार दिली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात मशीद, दर्गाहच्या सेवेसाठी दिलेल्या हजारो एकर वक्फ बोर्डाच्या इनामी जमिनी खालसा करून त्यांची खरेदी विक्री झाली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील वक्फ जमिनीच्या सद्यस्तिथीचा अहवाल बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे त्यातच वक्फ मंडळाने गुन्हे नोंद करण्याची तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे.
नळदुर्ग येथील जामा मशीद या संस्थेची गट नंबर 19,228,231,222,223,230,227,232 व 210 या 9 गटात 147 एकर 10 गुंठे इनामी जमीन आहे त्यातील बहुतांश जमीन इनामदार लोकांनी वाटणी, पोटहिस्से पाडून घेतली आहे तसेच महसूल अधिकारी यांच्याशी संगनमत करून सात बारा उताऱ्यावर स्वतःची व वारसांची नावे नोंद केली करित खरेदी विक्री व हस्तांतरण केले आहे. काही जमीन भूसुधार विभागाच्या उपजिल्हाधिकारी यांनी वक्फ मंडळास कोणतीही सूचना व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या खालसा केली आहे.
सर्व्हे नंबर 228 मधील 28 एकर 30 गुंठे जमिनीपैकी 2 एकर 1 गुंठा म्हणजे 81 गुंठे जमीन मैनोद्दीन शमशोद्दीन इनामदार, मिन्हाजोद्दीन इनामदार व मोईजोद्दीन इनामदार या 3 इनामदार लोकांनी 18 ऑकटोंबर 2015 रोजी दोन जणांनां विकली आहे. सदरील जमीन भूसुधार उपजिल्हाधिकारी यांनी 17 जानेवारी 2011 रोजी खालसा म्हणून घोषित केली आहे, जे की नियमबाह्य आहे. सदरील जमिनीवर प्लॉटिंग करून ती तुकडे पाडून विक्री करण्यात आली आहे. खोट्या कागदपत्राधारे तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीर विक्री केल्याने त्यांच्यावर फसवणुकीसह वक्फ अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करावा अशी तक्रार जिल्हा वक्फ अधिकारी अहेमद मंजूर खान यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली आहे.या जमिनीचा सात बारा वर नावे कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.वक्फ जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार करू नये असे आवाहन मंडळाने केले आहे.
तुळजापूर तालुक्यात वक्फ मंडळाची 1 हजार 963 एकर जमीन आहे त्यात एकट्या नळदुर्ग येथे 830 एकर जमीन आहे. काटी येथील जामा मशीद यांची 254 एकर,ईदगह यांची नळदुर्ग शहरात 155 एकर जमीन आहे. मशीद हस्तदिरा व कब्रस्थान यांची 115 एकर,जामा मशीद शाही व कब्रस्तान यांची 278 एकर, मशीद आसार शरीफ व कब्रस्तान यांची 48 एकर,मशीद बाजार यांची 82 एकर, ताकीया इमदात अलिशहाव यांची जमीन आहे.