वकीलावर जीवघेणा हल्ला – डॉ अरुण मोरेसह 3 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
न्यायालयातील खटला सोडून दे अन्यथा जीव घेऊ असे म्हणत उस्मानाबाद येथील वकिल प्रथमेश मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी डॉ अरुण मोरे यांच्यासह 3 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ मोरे व त्यांचे 2 साथीदार हल्लेखोर फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान वकीलावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी उस्मानाबाद येथील वकील संघटनेने घटनेचा निषेध व्यक्त करीत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
उस्मानाबाद येथील वकील प्रथमेश सौदागर मोहिते हे घटस्फोट खटला लढण्यासाठी न्यायालयात हजर होते त्यांच्यासोबत पक्षकार डॉ. कांचन मोरे ह्या देखील हजर होत्या. खटला संपल्यानंतर वकील प्रथमेश मोहिते हे आपली गाडी घेऊन घराच्या दिशेने निघाले होते त्यावेळी कोर्टाच्या आवारात घटस्फोट खटल्यात प्रतिवादी असलेले डॉ अरुण मोरे व त्यांचे दोन सहकारीसह आले व वकील मोहिते यांना खटल्यातील वकीलपत्र मागे घे असे सांगत धमकावत होते.त्यानंतर मोहिते हे घरी जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे त्यांचा लक्षात आले. त्यानंतर आरोपी हे गाडीजवळ येताच त्यांनी गाडीत असलेल्या वकील प्रथमेश मोहिते यांच्यावर हल्ला चढवला ह्या हल्ल्यात प्रथेमश मोहिते यांच्या तोंडाला दुखापत झाली असून गाडीवर दगड फेकून मारल्याने मोठे नुकसान झाले आहे. मोहिते यांना तत्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम ३०७,३४१,५०६,१०९,४२७, ३४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉ. अरुण मोरे व त्यांचे दोन सहकारी हे फरार असून पोलीस त्यांचा अटकेसाठी प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे करीत आहेत. सदर घटनेमुळे मात्र वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मारहाण व हल्ला प्रकरणातील आरोपी डॉ अरुण मोरे व त्यांची पत्नी डॉ कांचन मोरे यांच्यात घटस्फोटचे प्रकरण न्यायप्रविष्ट असुन ते कोर्टात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी झाल्यावर या घटस्फोट प्रकरणातील डॉ कांचन मोरे यांचे वकील व नात्याने बंधू असलेले प्रथमेश मोहिते यांना कोर्ट आवारात शिवीगाळ धमकी देण्यात आली व नंतर त्यांच्यावर हल्ला करून गंभीर मारहाण केली. डॉ मोरे यांचे उस्मानाबाद शहरातील समर्थ नगर भागात स्वतःचे खासगी रुग्णालय असुन ते कोरोना काळात विविध असुविधा व तक्रारींनी चांगलेच चर्चेत आले होते.