लेटर बॉम्ब – शिस्तभंगाची ‘या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा – पालकमंत्री डॉ सावंत यांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
धाराशिव – समय सारथी
महावितरण विभागाचे लातूर येथील मुख्य अभियंता व धाराशिवचे अधीक्षक अभियंता यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आढावा बैठकीत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने काय कारवाई केली यांचा आढावा पालकमंत्री डॉ सावंत यांना न दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी करणारे पत्र दिले आहे. सावंत यांच्या या लेटर बॉम्बनंतर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
महावितरणचे अधिकारी शेतकरी यांच्यासह सामान्य ग्राहक यांना सुविधा, सेवा न देता मुजोरपणा करीत असल्याच्या अनेक आहेत. डीपी न बसविने, त्यासाठी लाच म्हणून पैसे घेणे तसेच वीज कनेक्शन न देणे या तक्रारी आता नेहमीच्या आहेत. मंत्री सावंत यांनी यापूर्वी जनता दरबार घेतला होता त्यावेळी ही शेतकऱ्यांनी महावितरणच्या असुविधाचा पाढा वाचला होता, तंबी देऊनही काही मुजोर अधिकारी सुधारत नसल्याचे यावरून दिसते त्यामुळे त्यांना कारवाईच्या शॉकची गरज आहे.
महावितरण संदर्भात विविध तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 28 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत आलेल्या तक्रारी अनुषंगाने 15 दिवसात निपटारा करुन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री सावंत यांनी दिले परंतु या अधिकाऱ्यांनी अहवाल दिला नाही. ही बाब राजशिष्टाचाराला धरून नाही त्यामुळे महावितरण अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.