धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात सुरु असलेल्या नगरोत्थान योजनेच्या रस्त्याची कामे निकृष्ट होत असुन उदघाटनाची लगीन घाई केल्यानंतर ही कामे कासवगतीने सुरु असल्याने जनता त्रस्त झाली आहे. अनेक ठिकाणी कामाचा दर्जा सुमार, निकृष्ट असुन रस्त्याच्या बाजुला असलेल्या डीपी, लाईट पोल, झाडे तसेच ठेवण्यात आल्याने धोका निर्माण झाला आहे. पोल, झाडे तसेच असल्याने अनेक ठिकाणी रस्ता हा नागमोडी वळणाचा झाला आहे. अनेक ठिकाणी चेंबर वर असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे कसरत करीत मार्ग शोधावा लागतो.
140 कोटी रुपयांच्या 59 डीपी रस्त्याच्या कामाचे कंत्राट हे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मर्जीतील डी सी अजमेरा या ‘लाडक्या ठेकेदार’ यांना मिळाले आहे त्यामुळे सत्ताधारी नगरसेवक यांना या विषयावर आवाज उठवायला व बोलायला अलिखित ‘बंदी’ आहे तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश न आल्याने ते अजुनही पराभवाच्या धक्यातून सावरलेले नाहीत, त्यात धाराशिवकरांची सहानशिलता परम टोकाची असल्याने सगळे फावत आहे. खराब रस्ते यामुळे ‘खड्डेयुक्त’ धाराशिव शहर अशी ओळख निर्माण झाली आहे, याचे श्रेय सर्व राजकीय पक्षांना कमी जास्त प्रमाणात जाते.
विशेष म्हणजे रस्त्यावर असलेले पोल शिफ्ट करण्यासाठी 25 लाख तर वृक्ष लागवड करण्यासाठी 50 लाखांची तरतूद योजनेत असतानाही पोल व झाडे तसेच ठेवून काही ठिकाणी काम सुरु आहे. धाराशिव नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असुन या कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी घेतली होती मात्र ती घोषणा सुद्धा हवेतच विरली. हे काम देताना अनेक तक्रारी, स्थगिती, राजकारण, आरोप प्रत्यारोप झाले होते त्यावरून हे काम उत्कृष्ट दर्जाचे होईल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरताना दिसत आहे.
धाराशिव नगर परिषद रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत 9,12,15 मीटर डीपी रस्ते करण्याचा निर्णय घेतला मात्र जुना रस्ता बरा असे म्हणण्याची वेळ आली आहे. 140 कोटी रुपयांच्या या योजनेत राज्य सरकार 85 टक्के 119.49 कोटी तर नगर परिषद 15 टक्के असा 21 कोटी वाटा देणार आहे. या कामामुळे शहरातील रस्त्याची, खड्डे समस्या मुक्त होईल अशी अपेक्षा होती मात्र भ्रमनिरास होत उलट अडचणी वाढल्या आहेत.
59 पैकी काही रस्ते हे डीपी रोड नसताना या योजनेत घेण्यात आले तर काही रस्त्यांची करोडो रुपयांची कामे यापुर्वी झालेली असताना देखील ती या योजनेत नव्याने घेण्यात आली असा आरोप शिवसेननेचे माजी जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी केला होता याला सोईस्कर बगल देत चुप्पी साधली गेली व निवडणुक विजयाच्या धामधुमीत कामे सुरु करण्यात आली.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी डी सी अजमेरा यांना काम मिळावे यासाठी राजकीय ‘शक्ती’ व कायदेशीर ‘युक्ती’ पणाला लावली त्यात त्यांना अपेक्षित यश आले. कामाच्या गुणवत्ता व दर्जाची जबाबदारी आमदार पाटील यांनी खांद्यावर घेतल्याचे जाहीर केले, टेंडर प्रक्रियेतील ‘ज्ञान’ व तांत्रिक बाबी सांगत सर्वांना ‘डोस’ पाजले मात्र निवडणुका संपल्या की त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले.
राजकीय डावपेच नंतर काम मिळाले खरे मात्र गुणवत्तेचे तीन तेरा होत आहे. करोडो रुपये खर्च होऊनही सुविधा मिळत नसतील तर योजना केवळ ठेकेदाराच्या आर्थिक भल्यासाठीच असेच म्हणावे लागेल. कामाच्या दर्जा बाबत आमदार ठेकेदार यांची कानउघडणी करतात का ते पाहावे लागेल.











