लाच प्रकरण – संस्थाचालक व्यंकटराव गुंड यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी फैसला
उस्मानाबाद – समय सारथी
संस्थेतील सहशिक्षकाची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून ती मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागून 25 हजारांची लाच स्वीकारले प्रकरनातील फरार आरोपी संस्थाचालक व्यंकटराव गुंड यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली मात्र त्यावर मंगळवारी फैसला होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक व शिक्षकाला उस्मानाबाद कोर्टाने एका दिवसात जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे गुंड यांना शनिवारी जामीन मिळेल अशी अपेक्षा होती मात्र कोर्टाने निर्णय मंगळवार पर्यंत राखून ठेवला. या प्रकरणात गुंड यांच्या वतीने ऍड मिलिंद पाटील यांनी काम पाहिले.
भाजप नेते तथा नामांकीत रुपामाता समुहाचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांच्यासह मुख्याध्यापक राजेंद्र सूर्यवंशी व सहशिक्षक अमोल गुंड यांच्यावर बेंबळी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या लाच प्रकरणी मुख्याध्यापक सूर्यवंशी व सहशिक्षक अमोल गुंड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुख्य आरोपी व्यंकटराव गुंड हे फरार आहेत. व्यंकट गुंड हे व्यवसायाने उद्योजक, शिक्षणसम्राट, बँकेचे चेअरमन,वकील आहेत. व्यंकट गुंड यांना लाचलुचपत विभागाने लाचेच्या कटात मुख्य आरोपी केले आहे.
ऍड गुंड हे प्रतिष्ठित असुन त्यांच्या मुलाचा लग्नाचा साखरपुडा हा रविवारी असल्याने याचा सहानभूतीपूर्वक विचार होऊन जामीन मिळेल अशी अपेक्षा होती दरम्यान रविवारचा विवाह कार्यक्रम कौटुंबिक कारणाने रद्द केला आहे.
संस्थेच्या बांधकाम निधीच्या नावाखाली 50 हजार रुपये लाच म्हणून मागण्यात आली त्यात 25 हजारावर व्यंकट गुंड व मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी सेटलमेंट केली असा आरोप आहे. संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी शिक्षकाला 50 हजारांची लाच मागितली आणि 25 हजार रक्कम अंतीम केली, लाचेची ही रक्कम स्वतः न स्वीकारता एका सहशिक्षक अमोल गुंड याला घ्यायला लावली.
पाडोळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक महाविद्यालय येथे लाचलुचपत विभागाने कारवाई केली. लाचलुचपत विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात कारवाई करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. श्री.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल खांबे ला. प्र.वि.औरंगाबाद प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे,चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.