लाचखोर मनीषा राशीनकर यांची जेलमध्ये रवानगी – 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
अनेक महत्वपूर्ण माहिती हाती – गौणखनिज विभागासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचे होणार जबाब
महसुल विभागातील अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या रडारवर
उस्मानाबाद – समय सारथी
लाचखोर उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर व कोतवाल जानकर यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली असुन न्यायालयाने त्याना 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. वाळूमाफियाकडून लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या तपासात अनेक महत्वपूर्ण माहिती व पुरावे हाती आली असल्याची सूत्रांची माहिती आहे. या लाचखोरी प्रकरणी गौणखनिज विभागासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब होणार असुन महसुल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या रडारवर आहेत. गौनखनिज हा विभाग अप्पर जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात येत असल्याने त्यांच्यासह अन्य अधिकारी यांची चौकशी व जबाब घेतले जाऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. राशीनकर प्रकरणात लाचलुचपत विभागाच्या हाती महत्वपूर्ण पुरावे आहेत. राशीनकर यांच्या अहमदनगर येथील घरावर टाकलेल्या धाडीत काय सापडले याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. उपविभागीय दर्जाचा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने जिल्हा प्रशासनाची पोलखोल झाली आहे. दरम्यान राशीनकर यांच्या जागी कोणत्या अधिकाऱ्यांकडे पदभार जातो यावर बरीच चर्चा रंगली आहे.
राशीनकर यांच्यावर ट्रॅप होण्याच्या 2 दिवस अगोदर त्यांनी मोठे कलेक्शन करून पुणे वारी केली असल्याची माहिती आहे. राशीनकर यापूर्वी 4 वर्ष पोलीस उपनिरीक्षक होत्या. लाच प्रकरणात त्यांनी पंचासमक्ष लाच मागितली व स्वीकारली तसेच कॉल रेकॉर्डसह अनेक पुरावे हाती लागल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असुन जेलमधील मुक्काम वाढू शकतो. लाच प्रकरण सोबतच त्यांच्या बेहिशोबी अपसंपदा याची चौकशीची प्रक्रिया सुरू होणार आहे.राशीनकर यांनी चारा छावणी दंड माफसह तलाठी बदली, कुळाचे निकाल यातील अनेक रंजक किस्से चांगलेच गाजत आहेत. भूम उपविभाग मधील काही अधिकारी या वाळू माफियांच्या घोटाळ्यात सहभागी आहेत.
भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांना वाळू माफियाकडुन लाच घेतल्या प्रकरणी भूम येथील न्यायालयाने 30 जुलैपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती ती आज संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली त्यामुळे आता या दोघांना उस्मानाबाद जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी दर्जाचा उच्च पदस्थ अधिकारी जाळ्यात अडकल्याने महसूल विभागात सुरु असलेली खुलेआम लाचखोरी उघड झाली आहे. राशीनकर यांच्या लाचेच्या रकमेत वाटेकरी कोण ? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला असुन त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
भूम परंडा येथील उपविभागीय अधिकारी यांनी वाळू माफियांकडून दरमहा १ लाख १० हजारांचा हप्ता ठरवून घेतला, भूम परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू घाट असुन या भागात वाळू तस्करी खुलेआम होते. एका वाळू विक्रेत्याकडून दरमहा १ लाखांचा हप्ता घेतल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात दगड,माती ,मुरूम वाळू असे गौण खनिज,स्टोन क्रशर, वीट भट्टी यासह अन्य कामे विनाकारवाई सुरू ठेवण्यासाठी किमान दरमहा १२ ते १५ कोटींची रक्कम महसूल विभागातील विविध अधिकारी हे हप्त्याच्या स्वरूपात घेत असल्याची चर्चा आहे, ही रक्कम कोणाकोणाच्या घशात जाते.
राशीनकर या घेतलेल्या हप्त्यातील रक्कम कोणत्या कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी यांना देत होत्या या दृष्टीने गौण खनिज अधिकारी यांच्यासह काही अधिकारी यांचे लेखी जबाब होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.