त्रिसदस्यीय समिती गठीत – बस स्थानकसमोरील कॉम्प्लेक्स व आंबेडकर चौकसमोरील जागेचे प्रकरण
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील देवानंद रोचकरी बंधु यांच्या अडचणीत आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे.तुळजापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील तसेच जुने बसस्थानकासमोरील जागेबाबत चौकशी करून आवश्यक त्या अभिलेखांसह स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे, जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख स्वाती लोंढे व तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे या त्रिसदस्यीय समितीला दिले आहेत. या तिन्ही अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे जुन्या कागदपत्रांची पडताळणी करावी व अहवाल द्यावा असे आदेशीत केले आहे. देवानंद रोचकरी यांचा ताबा असलेल्या या दोन्ही जागेबाबत तुळजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कायदा विभागाचे तालुका कार्याध्यक्ष ऍड जनक धनंजयराव कदम- पाटील यांनी लेखी तक्रार केली होती त्याअनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पत्र काढले आहे.
प्राचीन मंकावती तीर्थकुंड हडप केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असुन सध्या ते उस्मानाबाद जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. तुळजापूर येथील जुने बसस्थानक समोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील जागा देवानंद रोचकरी यांनी तुळजापूर येथील नगर भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बोगस व बनावट कागदपत्रे करून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याची तक्रार ऍड कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे काही कागदपत्रांसह केली होती.त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सदरील जागा शासकीय जमीन असल्याची शक्यता असल्याने व न्यायालयीन महसुली प्रकरण असल्याने 1954-55 पासूनचे जुने अभिलेख तपासुन अतिक्रमण काढणेबाबत व नगर परिषदेची नोंद घेणेबाबत अहवाल सादर करावा असे सांगितले आहे त्यानुसार या सर्व कागदपत्रांची व अभिलेखांची संयुक्तपणे पडताळणी करावी व याबाबतचे नियम शासन अध्यादेश विचारात घेऊन नियमानुसार चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.तुळजापूर येथील जुने बस स्थानक समोर रोचकरी यांचे पत्र्याचे व्यापारी संकुल आहे.