रूग्णांची आर्थीक लुट, तक्रारीनंतर रक्कम परत करून कारवाईपासुन बचाव – वैद्यकीय क्षेत्रातील अजब फंडा
उमरगा येथील डॉ शेंडगे रुग्णालयाने केले 1 लाख 34 हजार परत – जिल्हाधिकारी यांनी शिफारस केल्यावर आली जाग
उस्मानाबाद – समय सारथी
उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलने रुग्णाकडून घेतलेले अतिरिक्त बिलाचे 1 लाख 34 हजार परत केले आहेत. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी रुग्णांच्या आलेल्या तक्रारीनंतर शेंडगे रुग्णालयाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची संलग्नता रद्द करण्यासह रुग्णालयाची परवानगी रद्द करण्याची लेखी शिफारस केल्यानंतर कार्यवाही टाळण्यासाठी हे पैसे परत केले आहेत. आधी रूग्णांची आर्थीक लुट करायची व जे रुग्ण तक्रार करतील त्यांची चौकशीअंती दंडास किंवा कारवाईस पात्र असलेली रक्कम परत करून कारवाईपासुन बचाव करायचा, असाच काहीसा प्रकार वैद्यकीय क्षेत्रात सुरू असल्याचे शेंडगे रुग्णालयाच्या निमित्ताने समोर आला आहे.
शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने रुग्ण सरोजाबाई बळीराम कांबळे या रुग्णाला आयसीयूमध्ये ऍडमिट केल्याचे भासवून योजनेतून पैसे लाटले. रुग्ण याकूब आलुरे यांच्याकडून योजनेतून उपचार देऊनही त्यांच्याकडून 12 हजार 180 रुपये अतिरिक्त आकारले तसेच रुग्ण सुलताना सैफन शेख यांच्याकडून 30 हजार व रुग्ण विजय भीमा जाधव यांना योजनेत उपचार देऊन सरकारकडून पैसे घेतले व रुग्णाकडूनही रोख 92 हजार घेतले. शेंडगे रुग्णालयाचे हे कृत्य महात्मा फुले योजनेच्या कलम 6.1,6.2 , 27.1 (सेवा स्तर करार) यांचे उल्लंघन असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी मार्च 2021 मध्ये दिला होता. या प्रकरणात कारवाईपासुन सुटका व्हावी यासाठी रक्कम परत केली आहे.
शेंडगे रुग्णालयाने एकाच प्रकारची चूक वारंवार केली असल्याचे निदर्शनास आले असल्याने या रुग्णालयाची महात्मा ज्योतिबा फुले योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची संलग्नता रद्द करणे व रुग्णालया विरुद्ध तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे त्यानुसार रुग्णालयााचे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा 2006 अंतर्गत परवाना रद्द करणे यासाठी कार्यवाहीची शिफारस जिल्हाधिकारी तथा फुले योजनेचे जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली होती मात्र तक्रारी व कारवाईच्या कचाट्यातून सुटका होण्यासाठी रक्कम परत केली मात्र रूग्णांची केलेल्या फसवणुकीचे काय ? हा प्रश्न समोर येत आहे.
काही रुग्णालये राजरोसपणे रूग्णांची अतिरिक्त मनमानी पद्धतीने बिल आकारणी करून आर्थिक लुट करतात मात्र रुग्ण त्याची तक्रार करीत नाहीत, जे रुग्ण तक्रार करतील त्यात चौकशी अंती रक्कम देय निघाली तर ती रक्कम देऊन मोकळे व्हायचा असाच काहीसा प्रकार व फंडा वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे. कोरोना काळातही असाच काहीसा प्रकार घडला असल्याची माहिती आहे.
डॉ शेंडगे गेल्या 1 महिन्यापासून फरार, पोलिसांना सापडेना ?
उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे संचालक डॉ आर डी शेंडगे यांच्यावर रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा दिल्या प्रकरणीचौकशी समितीच्या अहवालानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे तेव्हापासून ते फरार आहेत. शेंडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने 26 ऑक्टोबरला फेटाळून लावला आहे. डॉ शेंडगे हे गुन्हा दाखल झाल्यापासुन 12 ऑक्टोबरपासुन फरार आहेत. डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले होते.