राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रकरणांची आज सुनावणी
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे करणार बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण
उस्मानाबाद – समय सारथी
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची सुनावणी आज 13 नोव्हेंबर रोजी रविवारी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दुपारी 12 वाजता होणार आहे. पारदर्शक कारभार व्हावा व नागरिकांना प्रशासकीय कार्यपद्धती कळून लाचखोरीला आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या संकल्पनेने या बैठकीचे प्रथमच लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या बैठकीत बिअर बार, परमिट रूम यांचे परवाना नूतनीकरण व नवीन परवाने देण्याच्या अर्जावर सुनावणी व त्यानंतर निर्णय होणार आहे.गेली वर्षांपासून नवीन परवाना व नूतनीकरण प्रकरणे प्रलंबित असून आता त्यावर सुनावणी होणार आहे. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून सर्व कागदपत्रे,अहवाल आल्यावर त्याची तपासणी करुन ते मंजुरी देतात. परवाना घेताना प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यात येणार असून ग्रामपंचायत यांना याबाबत लेखी कळविले जाणार आहे.
ज्या प्रकरणात सर्व कागदपत्रे व नियमांचे पालन केले गेले आहे अश्या प्रकरणांना मंजुरी दिली जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही शासकीय कर्मचारी किंवा खासगी इसम यांच्या अमिषाला बळी पडून पैसे किंवा आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी केले आहे.पारदर्शक कारभाराला प्राधान्य देण्यात येणार असून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.