राज्यभर नियोजनबद्ध कार्यक्रम ? तुळजाभवानी मंदिरानंतर सिद्धरामेश्वर मंदिरात बॅनरबाजी
ड्रेसकोडचे सर्वत्र एकसारखेच फलक – धार्मिक व्यवस्थापक शितोळेंना नोटीस
धाराशिव – समय सारथी
राज्यातील काही मंदिरात सध्या लावण्यात आलेल्या बॅनरची मोठी चर्चा होताना दिसत आहे. रांजनगाव, तुळजाभवानी व त्यानंतर सोलापूर येथील सिद्धरामेश्वर मंदिरात भाविकांच्या तोकडे कपड्याबाबत एक बॅनर लावण्यात आले गेले. भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये, भारतीय संस्कृतीचे भान राखा अश्या आशयाचे हे बॅनर असुन सर्व बॅनरवरील मजकूर एक सारखाच आहे हे विशेष. ज्या मंदिरात हे बॅनर लावले गेले तेथील प्रशासनाला याबाबत काहीच माहिती नाही असे खुलासे केले जात आहे त्यामुळे संशय वाढला आहे. वरवर बॅनर पुरते दिसणारे हे प्रकरण तितके साधे नाही अशीही चर्चा आहे.
राज्यभरातील मंदिरात टप्याटप्याने ठरवून सारख्याच मजकुराचे बॅनर लावण्याचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम किंवा अजेंडा तर नाही ना ? या मागचा सूत्रधार कोण ? याचा व्यापक तपास गृहविभागाने करावा अशी मागणी होत आहे. तुळजाभवानी मंदीर येथील धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शितोळे यांना यात बळीचा बकरा न बनवता राज्यात असे जे प्रकार एकदाच घडले त्याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.
तुळजाभवानी मंदिरातील बॅनर लावण्यापूर्वी जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे व स्थानिक आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना याबाबत कल्पनाही देण्यात आली नाही हे विशेष.
तुळजाभवानी मंदिरात बॅनर लावल्यावर स्थानिकांसह काहींनी संस्कृती जतन असे म्हणत कौतुक केले तर काहींनी व्यक्ती स्वातंत्रावर घाला अशी टीका केली त्यानंतर अवघ्या 8 तासात तसा निर्णय झाला नसल्याचा खुलासा करीत मंदीर संस्थानने यु टर्न घेतला. विशेष म्हणजे तहसीलदार तांदळे व शितोळे यांनी याबाबतीत पुजारी व इतर लोकांनी केलेला सत्कार देखील स्वीकारल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले मात्र आता शितोळे यांच्यावर खापर फोडून प्रकरण संपविन्यावर भर दिल्याचे दिसते.
वरिष्ठांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेले डिजिटल फलक ही गंभीर बाब आहे. 48 तासाच्या आत याप्रकरणी आपला खुलासा सादर करावा. मुदतीत तो प्राप्त न झाल्यास आणि खुलासा असमाधानकारक असल्यास आपल्याविरोधात प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा तुळजाभवानी मंदिर संस्थांनाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी धार्मिक सहव्यवस्थापक तथा सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांना नोटीसीत दिला आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक देवी दर्शनासाठी येतात. गुरूवारी मंदिर परिसरात अचानक डिजिटल फलक झळकल्याचे दिसून आले. मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी असभ्य आणि अशोभणीय कपडे घालण्यास बंदी असल्याचे त्यावर ठळक अक्षरात लिहिण्यात आले होते. फलकावर तुळजाभवानी मंदिर संस्थान असा उल्लेखही करण्यात आला होता. प्रत्यक्षस्थळ पाहणीदरम्यान या सगळ्या बाबी आढळून आल्या नमूद केले आहे. नोटीसीच्या प्रत मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि मंदिर समितीचे विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.