राजीनामा – भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप, विरोधकांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करायला लावले
अपमानजनक वागणुकीचा आरोप – कंटाळून राजीनामा देण्याचे सत्र सुरूच
धाराशिव – समय सारथी
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला धाराशिवमधील भाजप जिल्हा कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी असलेल्या जोशीला लोमटे यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप करीत पदाचा राजीनामा दिला. आमदार पाटील यांनी अपमानस्पद वागणूक दिली त्यांच्या व अर्चना पाटील यांच्या नेहमीच्या वागण्याला कंटाळून आपण राजीनामा देत आहे. आमदार पाटील यांच्या सांगण्यावरुन माझ्या नातेवाईकांनी त्यांच्या विरोधकांवर अट्रॉसिटीचे गुन्हे नोंद केले, पाटील कुटुंबाने आमचा पुरेपूर वापर केला असे त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. यापूर्वी देखील अपमानस्पद वागणूक दिल्याचा आरोप करीत भाजप महिला जिल्हा अध्यक्ष अर्चना अंबुरे यांनी राजीनामा दिला होता आता ते सत्र सुरूच आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर या गावातील 40 वर्ष राणाजगजितसिंह पाटील यांच्या कुटुंबासोबत असलेल्या पांडुरंग बागडे यांच्या मुलगी जोशीला लोमटे या जिल्हा चिटणीस आहेत. जोशीला यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जोशीला लोमटे यांनी सावित्रीच्या लेकी हा कार्यक्रम घेतला होता यादरम्यान जोशीला यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना बोलावले होते. सलगर यांना बोलवल्यामुळे अर्चना पाटील यांनी नेहमी टोमणे मारले व अपमान केला त्यानंतर आमदार राणाजगजिसिंह पाटील यानी घरी बोलावून थेट शिवीगाळ केली. या शिवीगाळ केल्यानंतर जोशीला लोमटे यांनी पत्रकार परिषद घेत राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांबद्दल माझ्या भावाला उसकावून त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करण्यासाठी भाग पाडले असा गंभीर आरोप जोशीला लोमटे यांनी केला आहे.
पाटील परिवाराने जेव्हा राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश केला तेव्हा त्याच्या जयजयकार करण्यासाठी महिला रोजंदारीने बोलाविल्या, ते जातील त्या पक्षात व त्यांना कुटुंब मानून दिवस रात्र काम केले मात्र शेवटी गेली अनेक वर्षाचे फळ म्हणून अपमान भोगायला लागला असे सांगत त्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली. दरम्यान या प्रकारावर भाजपकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.