येडेश्वरी देवी मंदिराला मिळणार ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा – शासनाने प्रस्ताव मागवीला, प्रशासन लागले तयारीला
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या मंदिराला अ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद याबाबतची कागदपत्रे, भाविकांची गर्दी बाबतचा पोलिस अहवाल व इतर आवश्यक बाबींची जमवाजमव करीत असुन लवकरच परिपूर्ण प्रस्ताव सरकारकडे सादर केला जाणार आहे. आगामी काळात येडेश्वरी देवीच्या मंदिराला अ दर्जा मिळाल्यास शासकीय निधी मिळणार असुन रस्ते, पाणी यासह अन्य पायाभूत सुविधा करता येणार आहेत. येडेश्वरी मंदीराला सध्या ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा आहे.
ज्या तीर्थक्षेत्र ठिकाणी भाविकांची संख्या ही 15 लाख पेक्षा जास्त असते त्या ठिकाणी अ दर्जा दिला जातो. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत राज्याचा ग्रामविकास विभाग तीर्थक्षेत्र दर्जा ठरवून त्यानुसार भाविकांसाठी पायाभूत सुविधा, यात्रा काळात उपाययोजना करतो. राज्य सरकारसह केंद्र सरकारचा निधीही मिळू शकतो. शासनाने प्रस्ताव मागवीला आहे त्यानुसार कागदपत्रे सादर करुन असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव हे स्वतः या प्रस्ताव व तांत्रिक बाबीकडे लक्ष देत आहेत. लवकरच याची प्रक्रिया पुर्ण होऊन धाराशिवकरांचे स्वप्न व गेली अनेक वर्षाची मागणी पूर्णत्वास येईल.
अ दर्जासोबतच स्वतंत्र यात्रा अनुदान सुद्धा द्यावे – सरपंच बारकूल
येडेश्वरी देवीचे वर्षातून 2 मोठे उत्सव व यात्रा असतात. नवरात्र उत्सव व चैत्र यात्रेला येथे देशभरातून लाखो भाविकांची मोठी गर्दी असते. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन भाविक येडेश्वरी दर्शनाला येतात. तुळजाभवानी देवीचा नवरात्र उत्सव व यात्रा नियोजन करण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र यात्रा अनुदान देते त्याच धर्तीवर येडेश्वरी देवीला देखील यात्रा अनुदान द्यावे अशी मागणी सरपंच विकास बारकूल यांनी केली आहे.ग्रामपंचायतकडे उत्पन्नाचे स्रोत कमी आहेत त्यातच सध्या कोणतेही यात्रा अनुदान नसल्याने ग्रामपंचायतला सगळा खर्च करताना तारेवरची कसरत होत आहे. अ वर्ग तीर्थक्षेत्र व्हावे ही मागणी होती ती आता पुर्ण होताना आनंद होत आहे.
वर्षातून 2 मोठ्या यात्रा, लाखो भाविकांची गर्दी – येडेश्वरी देवीचा इतिहास वाचा
येडेश्वरी देवीच्या येरमाळा लगतंच येडशी येथील रामलिंग मंदीर असुन त्याचा देखील पर्यटन विकास यानिमित्ताने होणार आहे. देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. पहिल्या यात्रेच्यावेळी आई येडेश्वरी येरमाळा गावात जाते आणि तीन महिने गावातचं मुक्काम करते. तीन महिने झाल्यानंतर श्रावण महिन्यात देवी मूळ मंदिरात वापस येते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून येरमाळा येथील देवी येडेश्वरी परिचित आहे.येडेश्वरी देवीची आख्यायिका अशी सांगितली जाते, शंकराला पार्वतीने सांगितले, दंडक अरण्यात प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात फिरत आहेत. त्यास मी एकदा तरी फसवेन म्हणून दंडक अरण्यात पार्वतीने सीतेचे रूप घेवून रामास फसविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रभु श्रीरामांनी ‘तू वेडी आहेस आई’ असे पार्वतीस म्हटले. तेव्हापासून या देवीस ‘येडाई’ हे नाव पडले व या डोंगरास येडेश्वरीचा डोंगर म्हणून ओळखले जाऊ लागले.