येडशी येथे 50 बेडचे कोविड केअर सेंटर चालू करा
उस्मानाबाद – समय सारथी
येडशी येथे कोविड केअर सेंटर चालू करावे अशी मागणी सरपंच गोपाळ नागटिळक, उपसरपंच सुधीर सस्ते व ग्रामविकास अधिकारी संजय आडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येडशी गावची लोकसंख्या वीस हजारच्या वर आहे तसेच येडशी गाव चौरस्त्यावर असल्याने आजुबाजुच्या दहा ते पंधरा गावांतील नागरिकांचा दैनंदिन कामानिमित्त ये-जा असते तसेच येडशी गावामध्ये कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे येडशी गावामध्ये आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना या रोगावर येडशी व परिसरातील खेडेगावातील नागरिकांना तातडीने उपचार मिळावा, यासाठी येडशी गावामध्ये सर्व गावकर्यांच्या मदतीने जनता विद्यालय या ठिकाणी 50 बेडचे कोविड केअर सेंटर चालू करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. तसेच येडशीतील सर्व गावकरी या सर्वांच्या मदतीने जनता विद्यालयजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने कोविड रुग्णावर उपचार करण्यास सोयीस्कर आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन कोविड केअर सेंटर चालू करण्यासाठी परवानगी देऊन सहकार्य करावे अशी विनंती सरपंच नागटिळक, उपसरपंच सस्ते व ग्रामविकास अधिकारी संजय आडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.