मोजमाप पुस्तिका गहाळ, पोलिसात नोंद – प्रमाणके प्रकरणात 6 जणांची समिती गठीत
बोगस गुंठेवारी प्रकरणाची 11 जणांच्या समितीकडुन छानणी, कार्यवाही अंतीम टप्प्यात
यलगट्टे यांच्या जामीनावर 11 ऑगस्ट रोजी सुनावणी तर 2 आरोपी फरार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील 2 मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्या प्रकरणी नगर परिषदेचे स्थापत्य अभियंता वैजिनाथ द्रुकर यांच्या तक्रारीनंतर आनंद नगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी हरवलेल्या मालमत्तेच्या पुस्तिकेत नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. या 2 मोजमाप पुस्तिका नेमक्या कोणत्या कामाच्या होत्या हे मात्र नगर परिषदेने तक्रारीत नमूद न केल्याने माहिती समजू शकली नाही. प्रमाणके,मोजमाप पुस्तिका गहाळ होतात कश्या ? असे प्रश्न समोर आले आहेत.
बोंदर समितीच्या अहवालात महाराष्ट्र नगरोथान योजनेतील 45 लाख 10 हजार व 45 लाख 38 हजार रुपयांच्या अश्या तब्बल 90 लाख रुपयांच्या 2 मोजमाप पुस्तिका नसल्याचे नमूद केले होते. मोजमाप पुस्तिका नसल्याने या कामावर खर्च झाला की नाही हे नमूद करता येत नसल्याचा अभिप्राय दिला होता. त्याच कामाच्या की अन्य दुसऱ्या कामाच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याने हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
धाराशिव नगर परिषदेतील 2 हजार 54 पैकी तब्बल 1 हजार 88 प्रमाणके गहाळ प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. नगर परिषदेने गहाळ प्रमाणके कोणत्या कामाची, रक्कम यासह अन्य बाबी नमूद न केल्याने पोलिसात गुन्हा नोंद झाला नाही त्यामुळे यासाठी नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची समिती गठीत केली असुन सविस्तर अहवालानंतर गुन्हासह अन्य कारवाई केली जाणार आहे.
चौकशी समितीने नगर परिषदेत केवळ उपलब्ध असलेली कागदपत्रे व रेकॉर्डची पाहणी केली आहे, प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही हे विशेष. शहरातील करोडो रुपयांच्या विकास कामाची गुणवत्ता व काही कामे झालीत की नाहीत हेही मोजमाप पुस्तिका व प्रमाणके गहाळ असल्याने तपासता आले नाही. चौकशी समितीने अनेक गंभीर बाबी अहवालात नमूद केल्या आहेत त्यामुळे विकासकामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत तर काही कामांची पहिल्याच रिमझिम पावसाने पोलखोल केली असुन शहर खड्डेमय झाले आहे. रस्ते व खड्डे यात जितके शासकीय अधिकारी जबाबदार, तितकेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष सुद्धा झाले आहे.
दरम्यान बोगस गुंठेवारी प्रकरणाची व्याप्ती, संख्या व इतर तांत्रिक बाबी लक्षात घेता नगर रचना विभागाचे सहायक संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती गठीत केली असुन 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवड्यात या समितीचा अहवाल अंतीम होण्याची शक्यता आहे. खुल्या जागेवर,आरक्षित भुखंड, मूळ मालकाच्या जागेची, पर्याप्त कागदपत्रे नसताना गुंठेवारी यासारखे प्रकार घडले आहेत तर अनेक गुंठेवारीचे आदेश आहेत मात्र मूळ संचिका व कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. पैसे भरून न घेता आदेश देणे असे गंभीर प्रकार घडले आहेत. शहरातील मोक्याच्या ठिकाणच्या जागा, ग्रीन झोनमधील जागा गुंठेवारी केल्या आहेत.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी या सर्व प्रकरणात तारांकीत, लक्षवेधी सुचनाच्या माध्यमातुन आवाज उठविल्याने ही सर्व प्रकरणे बाहेर आलेली आहेत. खत निर्मिती न करता बायोमायनिंग घोटाळयाची चौकशी सुरु आहे तर घरकुल व नियमबाह्य रेखांकन आणि बांधकाम परवाने हे विषय ऐरणीवर आले आहेत.
निधीचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी नगर परिषदेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांची कोर्टाच्या आदेशाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. ते सध्या धाराशिव जिल्हा कारागृहात आहेत तर या गुन्ह्यातील आरोपी लेखापाल सुरज बोर्डे, अंतर्गत लेखानिरीक्षक प्रशांत पवार हे 2 आरोपी फरार आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.