धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील मुकुंद माधव कसबे या तरुणाच्या मृत्युच गुढं दिवसेंदिवस वाढत आहे, या घटनेत गेल्या सव्वा वर्षात 2 वेगवेगळ्या कहाण्या समोर येऊन गुन्हा नोंद झाल्याने संशय बळावला आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यु व त्यानंतर सव्वा वर्षांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा, अश्या बाबीमुळे घातपात की अपघात हा प्रश्न समोर आला आहे. हा घातपात असुन आरोपीना पाठीशी घालणे, बोगस साक्षीदार, कागदपत्रे तयार करणेसह काही पुरावे गायब केल्याचे प्रकार झाल्याचा आरोप या संशयात भर घालत आहे.
तपासात अनेक गंभीर त्रुटी दिसल्याने विशेष पोलिस महासंचालक वीरेंद्र मिश्र यांच्या आदेशाने ग्रामीण पोलिस ठाण्यातील या गुन्ह्याचा तपास आनंद नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी या बाबीला दुजोरा दिला असुन या घटनेची निष्पक्ष चौकशी करीत आहोत, यात आरोपीला पाठीशी घालणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या घटनेने धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणे व तेथील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचा ‘केंद्र’ बिंदु शोधणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.
धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 95 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी पोलिस निरीक्षक मारुती शेळके यांना अटक केली, सहकारी पोलिस महिलेच्या मुलाला एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ही लाच घेण्यात आली, पोलिस महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. शेळके यांचे निलंबन करण्यात आले असुन खातेअंतर्गत चौकशी सुरु आहे. लाचेच्या या घटनेनंतर एका मागुन एक कारनामे समोर येत आहेत.
21 मार्च 2024 रोजी येडशी येथील हॉटेल कालिका ढाबा येथे वेटर मुकुंद माधव कसबे (रा मोहा, ता कळंब) हा काम करीत होता. काम करीत असताना ढाब्यासमोर सिमेंट काँक्रेटवर पडून कानातुन रक्त आल्याने त्यास रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले व 23 मार्चला त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला अशी तक्रार राहुल बाळासाहेब देशमुख यांनी दिली त्यावरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची मयत क्रमांक 17/24 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद घेण्यात आली. त्यावेळी कोणावरही संशय तक्रार नसल्याचा जबाब देशमुख यांनी दिला.
देशमुख यांना घटनेच्या तब्बल 1 वर्ष 3 महिन्यांनी साक्षात्कार झाला व त्यांनी धाराशिव ग्रामीण पोलिसात 2 जुन 2025 रोजी फिर्याद दिली की, मला आज रोजी ढोकी येथील धनराज किसन कांबळे यांचेकडुन माहिती झाले की, मुकुंद कसबे हा ढाब्यासमोरील उड्डाण पुलाजवळ लातुर ते बार्शी रोडवर गेला असताना बार्शीकडुन येणारे एका मोटर सायकलने त्यास जोराची धडक दिली त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर तो पडलेल्या ठिकाणाहुन उठून ढाब्याकडे चालत आला व काँक्रेटच्या कोब्यावर पडल्याने कानातून रक्त आले. त्यावेळी मला तो काँक्रेटवर पडल्याने रक्त येऊ लागले असे वाटल्याने मी व लक्ष्मण जाधव त्यास दवाखान्यात घेऊन गेलो व उपचारानंतर त्याचा मृत्यु झाला म्हणुन भादवी कलम 304 अ, 279 व मोटार वाहन नियम 187 प्रमाणे 2 जुन 2025 ला गुन्हा नोंद केला.
एकाच घटनेच्या 2 वेगवेगळे कहाणी व गुन्हे नोंद झाल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहे. देशमुख यांनी तब्ब्ल 1 वर्ष 3 महिन्यांनी अपघाताची फिर्याद देत गुन्हा का नोंदविला. जर अपघाताची घटना धनराज कांबळे यांना माहिती होती तर ती सव्वा वर्ष का लपवून ठेवली ? अपघात करणाऱ्याला त्यांनी इतके दिवस पाठीशी का घातले. त्या मागचा त्यांचा हेतू काय होता? कांबळे हे आता संशयाच्या भोवऱ्यात आडकले आहेत. कसबे यांच्या पोस्टमार्टम अहवालातील जखमा व सुरवातीला दिलेली तक्रार जुळत नसुन त्याला अनुसरून नंतर अपघाताचा बनाव करण्यात आला का ? कसबे याच्यावर जे उपचार करण्यात आले त्यातील अनेक कागदपत्रे गायब करण्यात आले असुन यात हात कोणाचा ? या सगळ्या कटाचा मास्टर माईंड कोन? यासह अन्य प्रश्न विचारले जात आहेत.