मुरुमाचे राजकारण व श्रेयवाद – ही रस्त्याची कामे आमचीच उस्मानाबाद नगर परिषदेचा दावा
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद नगर परिषदेची निवडणूक आगामी काही महिन्यात होणार असल्याने अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच त्यातच पावसाळा असल्याने शहरातील अनेक भागात रस्त्यावर खड्डे, चिखल व नाली नसल्याने अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. सध्या अनेक ठिकाणी मुरूम टाकून नाली साफ करुन नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविल्याचे व आपण कर्तव्यदक्ष असल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे पेव फुटले आहे. शहरातील अनेक ठिकाणी मुरूम टाकण्याची कामे ही नगर परिषदेने केल्याचे स्पष्टीकरण देत श्रेय घेऊ नये असा सल्ला नगर परिषदेने प्रसिद्धी पत्रक मार्फत दिला आहे.
उस्मानाबाद शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील बहुतांशी रस्त्यावर चिखल झालेला असल्याने नागरिकांना रहदारी करणे गैरसोयीचे झालेले आहे यावर उपाययोजना म्हणून नगर परिषदेच्या ठेकेदारामार्फत सदरच्या रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम चालू केलेले आहे व रस्ते नागरिकांना वाहतुकीसाठी सुरळीत करून देण्यात येत आहेत. काही ठिकाणी काही खाजगी व्यक्ती या स्वतः रस्त्यावर मुरूम टाकत असलेबाबत नागरिकात संभ्रम निर्माण करीत आहेत असे या कार्यालयाच्या निदर्शनास आलेले आहे. वास्तविक पाहता शहरामध्ये टाकण्यात येणारा मुरूम हा नगरपरिषदेमार्फतच टाकण्याचे काम सुरू आहे तसेच नागरिकांना ज्या ठिकाणी मुरूम टाकणे आवश्यक वाटते अशा नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण यलगट्टे यांनी केले आहे. उस्मानाबाद नगर परिषद व्यतिरिक्त मुरूम टाकण्याचे व दुरुस्तीचे काम इतर कोणीही करत नाही याची नोंद नागरिकांनी घ्यावी असे नगरपरिषदे मार्फत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
अनेक जण रस्त्यावर खड्डे असल्याचे फोटो टाकत लगेच दुसऱ्या दिवशी ते खड्डे बुजावताना स्वतःचे फोटो टाकून नागरिकांच्या समस्या, मुरूम स्वखर्चाने टाकून समस्या सोडविल्याचे भासवित आहेत तसेच त्या कामावर स्वतः उभे राहून नागरिकांसोबत फोटो काढत आहेत, ही बाब निदर्शनास आल्याने आम्ही हे पत्रक जारी केल्याचे यालगट्टे यांनी सांगितले. आम्ही केलेल्या कामाची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.
नगर परिषद काही ठिकाणी काम करीत आहे तर काही ठिकाणी इच्छुक उमेदवार स्वखर्चाने काम करीत आहे हे सत्य आहे. आशा या स्तिथीत नगर परिषदेने नेमकी कोणती कामे केली व इच्छुक उमेदवारांनी कोणती कामे केली याची यादी समोर येणे गरजेचे आहे तरच नागरिकांतील संभ्रम दूर होणार आहे. नगर परिषद व इच्छुक अशी दोन्ही बाजूनी ठिकठिकाणी अचानक सुरु झालेल्या कामाने जनतेला मात्र काही काळ दिलासा मिळाला आहे. नगर परिषदेने अनेक भागात नागरी सुविधा न दिल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे भीषण वास्तव आहे मात्र त्यावर कोणीच आवाज उठवत नाही. अनेक ठिकाणी कामे बोगस व निकृष्ट झाली आहेत त्यामुळे लोकांचे मुख्यत्वे पावसाळ्यात हाल होत आहेत.