मुदत संपली, मार्ग मोकळा … तेरणा कारखान्याचा ताबा आता जिल्हा बँकेने भैरवनाथ समूहाला देण्याची गरज
उस्मानाबाद – समय सारथी
डीआरएटी कोर्टाने ट्वेंटीवन उद्योग समूहाला अपीलात जाण्यासाठी देण्यात आलेली एक आठवड्याची मुदत आज संपली असून या मुदतीत त्यांनी अपील न केल्याने तेरणा कारखान्याचा न्यायालयीन वाद संपला आहे असेच म्हणावे लागेल. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता जास्त वेळ वाया न घालवता तेरणा कारखान्याचा ताबा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाकडे देणे गरजेचे आहे जेणेकरून तेरणेचे धुराडे लवकर पेटेल. देशमुख समूहाने यावेळी सामंजस्य दाखवील्याने शेतकरी व सभासदांनी आभार व्यक्त केले.
तेरणा कारखाना गेली 2012 पासून म्हणजे तब्बल 10 वर्षांपासून बंद असून भंगार अवस्थेत गेला आहे. हजारो कामगार यांचे रोजगार गेल्याने ते बेघर झाले तर 30 ते 40 हजार शेतकरी व सभासद यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले त्यामुळे आता डॉ सावंत हे लवकरात लवकर हा कारखाना सुरु करतील ही अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया गेली 1 वर्षांपासून प्रलंबित असून जिल्हा बँक, भैरवनाथ उद्योग समूह व ट्वेंटीवन उद्योग समूह याचा उच्च न्यायालय, डीआरटी व डीआरएटी कोर्ट असा वाद सुरु होता मात्र डीआरएटी कोर्टाने उस्मानाबाद जिल्हा बँकेने राबवलेली निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा निकाल दिला होता व अपिलासाठी ट्वेंटीवन समूहाला एक आठवड्याची मुदत दिली होती ती संपली आहे त्यामुळे आता कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने याबाबतची पुढील प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे.
जिल्हा बँकेने तेरणा 25 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यासाठी 12 नोव्हेंबर 21 रोजी सहाव्या वेळेस निविदा प्रसिद्धी केली होती. 25 नोव्हेंबर 21 रोजी उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निविदा उघडण्यात आल्या त्यात भैरवनाथ साखर उद्योग समूहाने भरलेली निविदा मान्य करत मंजुर करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा बँक,अवसायक व भैरवनाथ उद्योग समूह यांच्यात 6 डिसेंबर 21 रोजी त्रिस्तरीय करार करण्यात आला मात्र बँकेने कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा भैरवनाथ समूहाला देण्यापूर्वी वाद कोर्टात गेला.
माजी मंत्री अमित देशमुख यांचा ट्वेंटीवन समूह वारंवार कोर्टात जात होता. तेरणेचा प्रश्न यामुळे प्रलंबित राहत असल्याने शेतकरी सभासद यात नाराजीचा सुरु होता तर देशमुख पुन्हा यावेळी कोर्टात गेल्यास आम आदमी पार्टीने थेट सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. तेरणा बचाव संघर्ष समिती,आप पार्टी, शेतकरी व सभासद यांच्या लढ्याला यश आले आहे तर जिल्हा बँकेने यात न्यायालयीन प्रक्रियेत मोठा पाठपुरावा केला आहे.