मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आश्वासन – आमदार कैलास पाटील मात्र उपोषणावर ठाम
उस्मानाबाद – समय सारथी
अतिवृष्टी व सततच्या पावसाच्या नुकसानीच्या भरपाईचा निधी लवकरात लवकर मंजुर करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार कैलास पाटील यांना दिले असले तरी आमदार कैलास पाटील हे आमरण उपोषणावर ठाम आहेत. मुख्यमंत्री यांच्या शब्दावर विश्वास आहे मात्र पैसे जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्यावर स्वतःहून आंदोलन मागे घेणार असल्याची भुमिका आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी उपोषणस्थळी आमदार कैलास पाटील यांची विचारपूस करीत मुख्यमंत्री शिंदे यांना फोन लावला व दोघांचे बोलणे करुन दिले. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी 6 दिवसाच्या आमरण उपोषण नंतर याची दखल घेत आश्वासन दिले.
पीक विमा व अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी उस्मानाबादचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरु असून आहे त्याचा 6 वा दिवस आहे. 282 कोटी रुपयाच्या निधी मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी मुख्यमंत्री यांना दिली. 2020 व 2021 च्या विमाबाबत बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.